20 June 2018

News Flash

सोलापुरात ‘ई-टॉयलेट’संकल्पनेला चांगला प्रतिसाद

शहरात विविध ठिकाणी ५१ ई-टॉयलेट उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.

‘स्मार्ट सिटी’ साठी सज्ज झालेल्या सोलापूर शहरात ‘ई-टॉयलेट’ची संकल्पना आता दृढ होत आहे. या संकल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे आशादायक चित्र दिसून येते.

सोलापूर शहराची केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशन योजनेअंतर्गत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये निवड केली होती. मागील दोन वर्षांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाचे नियोजन आखले जात आहे. सुमारे २२४७ कोटी खर्चाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम अद्यापि दृष्टिक्षेपास आले नसले तरी ‘ई-टॉयलेट’च्या माध्यमातून मात्र शहरातील सकारात्मक बदल दिसत आहेत.

शहरात विविध ठिकाणी ५१ ई-टॉयलेट उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झाला. सध्या अस्तित्वात असलेल्या ई-टॉयलेट्सच्या उभारणीसह दुरूस्ती व देखभालीची पुढील पाच वर्षांपर्यंतची जबाबदारी चेन्नईच्या ईरम सायंटिफिक कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक ई-टॉयलेटचा उभारणीचा खर्च दहा लाख ५० हजार रुपये इतका आहे. पहिल्या दहा ई-टॉयलेट्सच्या उभारणीवर एक कोटी १० लाखांपर्यंत खर्च झाला आहे.

सध्या शहरात पाच ठिकाणी दहा ई-टॉयलेटस्ची उभारणी होऊन त्यांचा वापर होत आहे. गेल्या २३ सप्टेंबरपासून आतापर्यंत या ई-टॉयलेट्सचा वापर ३४ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींनी केला आहे. ई-टॉयलेटच्या ठिकाणी एका बंद डब्यात एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये किंवा दहा रुपये यापैकी  कोणतेही एक नाणे टाकल्यास ई-टॉयलेटचा दरवाजा आपोआप उघडला जातो. या टॉयलेटमध्ये पाण्याची सुविधा आहे. मुख्य म्हणजे तेथे स्वच्छता असते. होम मैदानावरील ई-टॉयलेटचा उपयोग यंदा ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेत भाविकांसह नागरिकांना झाला. आसपासच्या नागरिकांकडून या ई-टॉयलेटचा वापर होत असून त्याची सार्वत्रिक सवय होऊ लागली आहे.

सिध्देश्वर मंदिरासमोरील होम मैदानासह सोलापूर महापालिका आवार, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जिल्हा न्यायालय आवार व साखर पेठेतील महापालिकेच्या अग्निशामक दल केंद्रालगत अशा पाच ठिकाणी प्रत्येकी दोनप्रमाणे दहा ई-टॉयलेट कार्यरत आहेत. स्त्री-पुरूषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट उपलब्ध आहेत. स्वच्छतेसाठी योग्य पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे प्रत्येक ई-टॉयलेट सुविधेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चांगला आणि सुयोग्य वापर होऊ शकेल अशा आणखी पाच ठिकाणी आणखी दहा ई-टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन लगेचच म्हणजे महिनाभरात नवीन ई-टॉयलेट उभारले जाणार आहेत.

वेबतंत्रज्ञानावर आधारित निर्मिती

ई-टॉयलेट संपूर्णत: ‘वेब’ तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यात ‘रिपोर्टिग सिस्टिम’ आहे. प्रत्येक ‘ई-टॉयलेट’चा दररोज किती वापर झाला, एखाद्या ई-टॉयलेटमध्ये पाणी साठा संपत आला आहे का, याची माहिती यंत्रणेला मिळते. कुणी या ‘ई-टॉयलेट’मध्ये काही तोडफोड केली किंवा जाणीवपूर्वक बिघाड केला असेल तर त्याचीही माहिती तत्काळ संबंधित यंत्रणेला मिळते. त्यानुसार तत्काळ कारवाई आणि दुरूस्ती केली जाते.

First Published on March 14, 2018 3:53 am

Web Title: good response to e toilet concept in solapur