शिबिराला चांगला प्रतिसाद; एक हजार कुटुंबांना स्वस्त धान्य

पालघर : पालघर जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार नागरिकांचे कामाच्या शोधात स्थलांतर झाले असून त्यापैकी सुमारे २५ हजार नागरिक जिल्ह्यात वास्तव्य करीत आहेत. अशा स्थलांतरित नागरिकांसाठी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सुरू केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून स्थलांतरित झालेल्या साडेसहा हजार कुटुंबीयांपैकी एक हजार कुटुंबांना काम करण्याच्या ठिकाणी स्वस्त धान्य उपलब्ध होत आहे.

सुमारे ३२ हजार नागरिकांपैकी २४ ते २५ हजार नागरिक जिल्ह्यामधील विविध ठिकाणी काम करत असल्याचे दिसून आले आहे. स्थलांतरित झालेल्या साडेसहा हजार कुटुंबांपैकी बाराशे कुटुंबीयांकडे रेशन कार्ड असून त्यापैकी एक हजार कुटुंबीयांना कामाच्या ठिकाणी स्वस्त धान्य मिळत आहे. जिल्हा परिषदेने स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबीयांसाठी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याची योजना बनवली असून या शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वीटभट्टीकडे विशेष लक्ष

पालघर जिल्ह्यात ४४४ पेक्षा अधिक वीट उत्पादन समूह असून या ठिकाणी बहुतांशी स्थलांतरित कामगार कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. वीट भट्टीच्या ठिकाणी सुमारे तीन हजार लाभार्थी कच्चे धान्य तर साडेचार हजार लाभार्थी पोषण आहाराचा लाभ घेत असल्याचे आरोग्य शिबीर पाहणीदरम्यान दिसून आले आहे. वीटभट्टीवर असलेल्या जुन्या व मोडक्या विटांच्या माध्यमातून स्थलांतरित कामगारांसाठी शौचालय उभारण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. तसेच होळीच्या सणाला गावी गेल्यानंतर सोबत रेशन कार्ड आणावे असे देखील स्थलांतरित कामगारांना सूचित करण्यात आले आहे.

सौम्य आजार

जानेवारीपासून सुरू झालेल्या या योजनेत सुमारे एक हजार स्थलांतरित नागरिक आजारी असल्याचे दिसून आले असून यापैकी अनेकांना त्वचा रोग, काहींना सर्दी-खोकला, ताप तसेच अतिसार व कंबरदुखीचे आजार असल्याचे देखील दिसून आले आहे. स्थलांतरित वीटभट्टीवरील बालकांना नजीकच्या अंगणवाडीत सामावून घेतले जात असून त्यांना नियमितपणे कच्चे धान्य व पोषण आहार मिळेल यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

टास्क फोर्सची बैठक

कुपोषणाच्या समस्यांसंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हा टास्क फोर्सची बैठक गेल्या आठवड्यात झाली. यात जिल्ह्यात विविध ठिकाणांहून स्थलांतरित होऊन येणारे तसेच कामानिमित्त जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवण्यासाठी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वीटभट्ट्यांवर व इतर स्थलांतरित ठिकाणी जनजागृती तसेच धान्य व्यवस्था उभारण्याचे ठरले.

स्थलांतरित कुटुंबे आहेत, त्या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी करण्यासोबत त्याला स्वस्त धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद लाभत आहे.  -सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर