X

वस्तू व सेवा करामुळे दिवाळी बाजारावर मंदीची काजळी

दिवाळीवरही जीएसटीची काजळी पसरणार असाच अंदाज बाजारपेठेतून व्यक्त होतो आहे.

एकेकाळी ‘दसरा-दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा’ ही म्हण घरोघरी उच्चारली जायची. या वर्षी विविध कारणांनी दसऱ्याचा उत्साह कमी झाला अन् ‘दसरा आनंद विसरा’ असे म्हणण्याची पाळी सामान्यांना आली. चलन निश्चलीकरण व वस्तू, सेवा कराचे परिणाम म्हणून बाजारात मंदीची मोठी लाट आली आहे. या वर्षी पाऊस चांगला झाला. पिकाचे उत्पन्नही बऱ्यापैकी आहे, मात्र सर्व भाव पडलेले असल्यामुळे बाजारपेठेतील मंदी दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे दिवाळीवरही जीएसटीची काजळी पसरणार असाच अंदाज बाजारपेठेतून व्यक्त होतो आहे.

नवीन हंगामासाठीच्या सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ५० आहे, मात्र बाजारपेठेत सध्या २ हजार ८०० ते २ हजार ९०० रुपयांनी सोयाबीन विकले जात आहे. या वर्षी मूग व उडीद काढणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे चांगल्या दर्जाचा माल झाला नाही. त्यामुळे बाजारात गुणवत्तेचा माल येत नाही. मुगाचा हमीभाव ५ हजार ५७५ रुपये आहे. बाजारपेठेत सध्या ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये या भावाने सर्वसाधारण मूग विकला जातो आहे. चमकी मुगाचा भाव ५२०० रुपये आहे. उडदाचा हमीभाव ५ हजार ४०० रुपये आहे. बाजारपेठेत सध्या ४ हजार ते ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलने उडीद विकले जात आहे. तुरीचा गतवर्षीचा हमीभाव ५ हजार ५० रुपये व या हंगामाचा ५४५० रुपये आहे. गतवर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे भाव गडगडले. याही वर्षी तुरीचे उत्पन्न प्रचंड होईल, असा अंदाज आहे. सध्या बाजारपेठेत ३ हजार ८०० रुपये क्विंटलने तूर विकली जात आहे.

हरभऱ्याचा भाव महिनाभरापूर्वीच ६ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल होता. आता पेरणीचा हंगाम आला आहे, तर सध्या ४ हजार ९०० रुपये क्विंटलने हरभरा विकला जातो आहे. सणाच्या कालावधीत साधारणपणे सर्व भाव वधारतात. या वर्षीचे चित्र मात्र उलटे आहे. गतवर्षी हरभरा डाळ १४० रुपये किलो होती. या वर्षी ६९ रुपये किलोने हरभरा डाळ विकली जात आहे. भाव वाढेल म्हणून ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल गोदामात ठेवला होता त्यांना गतवर्षीच्या निर्णयामुळे तोटा सहन करावा लागला. यात व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे दूध पोळल्यानंतर ताक फुंकून पिले जाते, तशी स्थिती निर्माण झाली आहे.

कोणी कितीही आवाहन केले तरी आलेला माल विकण्याकडेच शेतकऱ्यांचा कल आहे अन् बाजारपेठेत व्यापारी धाडसाने व्यापार करण्यास धजावत नाहीत. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत बाजारपेठेच्या उलाढालीवर ५० टक्केपर्यंत घट झाल्याचे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  दसरा, दिवाळीच्या सणाला खरीप हंगामातील नगदी पिके शेतकऱ्यांच्या हातात येतात अन् त्याचा परिणाम बाजारपेठेतील हालचालीत दिसून येतो. पिकूनही भाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आल्यामुळे आलेल्या पशातून आवश्यक त्या गरजा भागवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.  किराणा मालाबरोबर कपडा बाजारपेठेवरही मोठा परिणाम दिसतो आहे. दसऱ्याच्या सणाच्या वेळी उलाढालीत ३० ते ३५ टक्के घट झाली. दिवाळीचाही परिणाम असाच असेल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. प्रत्येक दुकानदाराकडे ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के व २८ टक्के जीएसटी आकारला गेलेला माल असतो. त्याच्या सर्व प्रकारच्या बारीकसारीक नोंदी व्यापाऱ्याला ठेवाव्या लागतात. ऐन सणासुदीच्या वेळी ही कटकट वाढल्यामुळे व्यापारी वैतागून गेले आहेत. ग्राहक, शेतकरी, व्यापारी हे सर्वच जण अडचणीत आल्यामुळे या वर्षीच्या दिवाळीला प्रकाशाच्या प्रतीक्षेपेक्षा काजळीची खात्रीच वाढली आहे.

  • Tags: goods-and-services-tax,
  • Outbrain