कृषी व औद्योगिक मालाची परदेशात थेट वाहतूक करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून नाशिकलगतच्या जानोरी येथे उभारण्यात आलेल्या हॅलकॉन कार्गो कॉम्प्लेक्स अर्थात मालवाहतूक सेवा केंद्रावर एचएएलने पहिले बोइंग ७४७-४०० या महाकाय मालवाहतुकीच्या विमानाचे यशस्वीपणे संचलन केले. नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाकडून या प्रकल्पास अद्याप हिरवा कंदील मिळाला नसला तरी मालवाहू विमानांच्या संचलनाचे प्रयोग सुरू झाले आहेत. याआधी या स्वरूपाच्या महाकाय मालवाहू विमानाचे या केंद्रावर यशस्वीपणे संचलन करण्यात आले होते.
रशियातून ५८ मेट्रिक टन आयात केलेले साहित्य घेऊन एअरब्रिज कार्गो एअरलाइन्सचे हे विमान नुकतेच या विमानतळावर उतरले. संबंधित कंपनीचे अधिकारी या विमानाच्या यशस्वी संचलनाचे साक्षीदार ठरले. अतिशय सहजपणे ही प्रक्रिया पार पाडून बी-७४७ विमान अल्पावधीत सर्व माल उतरवून परतीचे उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाले. केवळ साठ मिनिटांत आयात केलेले साहित्य उतरविण्यात आले. त्यानंतर ओझरच्या धावपट्टीवर हे विमान उभे करण्यात आले. मालवाहू विमानास उतरविणे, त्यातील माल उतरविणे व इतर सर्व प्रक्रिया ‘रेकॉर्ड ब्रेक’ वेळेत पूर्णत्वास नेण्यात आल्याचे एचएएलने म्हटले आहे. या कामात त्यांना अबकारी विभागाचे सहकार्य लाभले. ज्या दिवशी हे मालवाहू जहाज उतरले, त्याच दिवशी या विभागाने आयात मालाबाबतची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित माल ग्राहकाच्या स्वाधीन होईल, याची दक्षता घेतली. मालवाहू विमानाचे कॅप्टन ऑरलोव्ह यांनीही आनंद व्यक्त केला. ओझरच्या हवाई नियंत्रण पथकाची कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. या ठिकाणी उत्तम दर्जाची सेवा पुरविली गेल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर या मालवाहू विमानाने कोलकात्ताच्या दिशेने झेप घेतली.
दरम्यान, १५ मार्च २००८ रोजी या मालवाहतूक सेवा केंद्राचे उद्घाटन संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांच्या हस्ते करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ते कार्यान्वित झालेले नाही. हवाई उड्डाण प्राधिकरणाकडून त्यास हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे.