सोलापूरजवळील दुधनी येथे रविवारी मध्यरात्री मालगाडीचे इंजिन आणि ५ वॅगन रूळावरून घसरले होते. यात इंजिन, वॅगन व रेल्वे रूळाचे मोठे नुकसान झाले असून दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सोमवारी सुमारे १२ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. तर ४ ते ५ गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली.
हा अपघात मुख्य रेल्वे मार्गावर झाला. अजुनही या मार्गाची दुरूस्ती झालेली नाही. या मार्गावरून वॅगन हटवण्याचे काम मंगळवारीही सुरू आहे. सोमवारी दुपारी लूप लाइनवरून वाहतूक सुरू करण्यात आली. सध्या लूप लाइनवरून रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. आज (मंगळवार) दुपारी दुरूस्तीसाठी ब्लॉक घेतला जाण्याची शक्यता आहे.
सोमवारी या मार्गावरून जाणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेस, कोइमतूर एक्स्प्रेस या गाड्या सुमारे ६ ते ६.३० तास उशिराने धावत होत्या. मुंबईहून सोलापूरला जाणारी रात्री १०.४५ ची सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही सुमारे ४ तास उशिराने म्हणजे रात्री २.३० वाजता मुंबईतून निघाली. यामुळे ऐन सुट्याच्या हंगामात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
वाडीहून सिमेंटसाठीचा कच्चा माल घेऊन होटगी स्थानकाकडे रविवारी मालगाडी निघाली होती. ती मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दुधनी स्थानकाजवळ पोहोचली. गाडीचा वेग ताशी ५० किमी इतका होता. त्याचवेळी गाडीचे ब्रेक फेल झाले. धोका ओळखून चालकाने तातडीने नियंत्रण कक्षाला हा संदेश दिला. यावेळी गाडीला सेकंड लूपलाइनला घेण्यात येत होते. त्याचवेळी गाडीचे इंजिन घसरले. पाठोपाठ ५ वॅगनही रूळावरून घसरल्या. या अपघातामुळे लूपलाइनच्या रूळांना तडे गेले आहेत. त्यामुळे हैदराबाद, सिकंदराबादकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. अजूनही स्थिती पूर्वपदावर आलेली नाही.