उत्तरेकडील राज्यांत पान, मिरची, चिकू जलदगतीने पोहोचवणे शक्य

पालघर : पालघर जिल्ह्यात तयार होणाऱ्या शेतमालाला उत्तरेच्या राज्यांकडे पाठवण्यासाठी रेल्वेची मालगाडय़ांची सुविधा पालघरमधून उपलब्ध झाली असून त्यामुळे या भागातील पान, मिरची व चिकू उत्पादने उत्तरेच्या भागामध्ये किफायतशीर दरामध्ये आणि जलद गतीने पोहोचवणे शक्य होणार आहे.

शेतमालाला वाहतूक करण्यास टाळेबंदीच्या काळात अनुमती देण्यात आली असून जिल्हाधिकारी तसेच परिवहन अधिकारी यांच्या परवानगीने मिरची तसेच पान हा कृषीमाल उत्तरेकडील राज्यांमध्ये पाठवण्यास आरंभ झाला आहे. सुमारे दहा टन शेतमाल वाहून देणाऱ्या ट्रकचे भाडे हे ८० हजार रुपयांच्या जवळपास येत असून त्यामुळे शेतमालावर आठ रुपये प्रति किलो इतका वाहतुकीसाठी खर्च होत आहे. शिवाय ट्रकद्वारे प्रवासासाठी २४ ते ३६ तासांचा अवधी लागत असल्याने सध्याच्या उष्ण वातावरणात नाशिवंत पदार्थ खराब होण्याचे प्रकार वाढत आहेत.

विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील तसेच तालुका कृषी अधिकारी तरुण वैती व संतोष पवार यांच्या पाठपुराव्याने रेल्वेने सुरू केलेल्या मालवाहू सेवेचा लाभ जिल्ह्यातील शेतकरी बागायतदारांना यापुढे होणार आहे. पश्चिम रेल्वेने सुरू केलेल्या विशेष मालवाहू सेवेमध्ये मुंबईनंतर पहिला थांबा वापी येथे देण्यात आला होता. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्याची सुविधा लक्षात घेता या मालगाडय़ांना आवश्यकतेनुसार पालघर येथे थांबा देण्याचे पश्चिम रेल्वेने मान्य केले आहे.

मुंबई ते फिरोजपूर दरम्यान धावणाऱ्या विशेष मालवाहू सेवेला सारंणपूपर्यंत विस्तारित करण्याची मागणी देखील पश्चिम रेल्वेने मान्य केली आहे. त्याचप्रमाणे कोटा व लगतच्या भागात नव्याने थांबे मंजूर करून सुमारे चार रुपये प्रति किलो इतक्या किफायतशीर दराने व जलद गतीने या शेतमालाची वाहतूक होणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांना लोकडाऊननंतरच्या काळात देखील ही सुविधा सोयीची ठरणार आहे.

शुक्रवारी पहिली मालगाडी अपेक्षित

ही मालवाहू सेवेची पहिली गाडी शुक्रवारी पालघर येथे थांबण्याचे अपेक्षित असून त्यामध्ये येथील शेतकऱ्यांचा कृषीमाल चढविला जाईल असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या उपक्रमाला केळवे-माहीम तसेच वाणगाव-चिंचणी, बोर्डी आदी भागातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे.