सांगलीतील हजारो शेतकऱ्यांच्या नावात चुका

सांगली : नावाचे इंग्रजीकरण करीत असताना गुगल ट्रान्सलेटरमध्ये भगवानचे लॉर्ड, सुतारचे कारपेंटर, कोष्टीचे स्पायडरमॅन असे झाल्याने जिल्ह्य़ातील हजारो शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेपासूनच्या लाभापासून वंचित राहावे लागले. भाषांतरात झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले असून यासाठी गावोगावी दवंडी देऊन या चुका दुरुस्तीसाठी खातेदार शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना लागू केली. या योजनेचा पहिला हप्ता दोन हजार रूपयेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. मात्र यानंतर यामध्ये असलेल्या त्रुटी समोर आल्या. या त्रुटीची पाहणी करीत असताना यादीमध्ये शेतकऱ्यांची नावे वेगवेगळी असल्याचे आढळून आले.

जिल्हयामध्ये या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सुमारे पावणे तीन लाख आहे. या शेतकरी खातेदारांच्या नावाची यादी संगणकावर भरत असताना केंद्र शासनाची योजना असल्याने इंग्रजी भाषेत भरणे आवश्यक आहे. हे काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी यासाठी गुगल ट्रान्सलेटरचा वापर केला. यामुळे नावाचे स्पेिलग योग्य टाकले तर नावातही बदल झाले. संगणकाच्या कुवतीने हा बदल होत असताना भगवान नाव असेल तर त्याचे लॉर्ड, उत्तम असेल तर बेस्ट, महिलेचे नाव छाया असेल तर त्याचे श्ॉडो, आडनाव सुतार असेल तर कारपेंटर, कोष्टी असेल तर स्पायडर मॅन असे झाले आहे. या नावातील बदलामुळे खातेदार शेतकरी लाभापासून वंचित राहिले.

ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाने यासाठी युध्दपातळीवर बदल हाती घेतले असून यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. चुकीची नावे असलेल्या खातेदारांनी आधार कार्ड घेऊन नावात झालेल्या चुकीची दुरूस्ती ई-सेवा केंद्रात करावी यासाठी गावोगावी दवंडी देण्यात आली असून शेतकरी यासाठी आता धावपळ करीत आहेत.

तालुकास्तरावर शिबिरे

नावात डेटा एन्ट्रीतील भाषांतरामुळे काही खातेदारांच्या नावात बदल झाले असून हे बदल तातडीने करण्यात येत आहेत. सध्या यासाठी तालुकास्तरावर शिबिरही आयोजित करून हे बदल करण्यात येत असून आता ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. – यासिन पटेल, जिल्हा तांत्रिक समन्वयक, पंतप्रधान सन्मान योजना.