सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते ‘सुधारककार’ गोपाळ गणेश आगरकर यांच्या अर्धाकृती पुतळय़ाची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार त्यांचे जन्मगाव असलेल्या टेंभू (ता. कराड) येथे शुक्रवारी उघडकीस आला. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

केसरी, सुधारक या वृत्तपत्रांचे संस्थापक, संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी टेंभू येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या स्मरणार्थ गावात ‘आगरकर प्रतिष्ठान’ कार्यरत असून त्यांच्यावतीने गावात वाचनालय आणि विद्यालय चालवले जाते. या शाळेच्या प्रांगणात २००३मध्ये हा पुतळा उभारण्यात आला. त्याची विटंबना झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. यानंतर लगोलग हा पुतळा झाकून ठेवण्यात आला.  या ठिकाणी सध्या पोलीस तळ ठोकून आहेत. पुढील शोध सुरू आहे.