राज्यभर धनगर समाजाने आंदोलन केले आहे. पंढरपुरात आपण विठोबाच्या साक्षीने ढोल वाजवला आहे. आपल्या ढोलच्या आवाजाने सरकार जागे होईल आणि धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढेल. पण असे जर घडले नाही तर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ आणि शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्वर ओक’ समोर जाऊन आपण ढोल वाजवणार असल्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला  आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये ‘ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन’ करण्यात आले. येथील चंद्रभागा नदीच्या काठावर असलेल्या महाद्वार घाट येथे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक धनगर बांधवांनी पारंपरिक वेश परिधान करून ढोल आणि भंडारा उधळून सहभाग नोंदविला. या वेळी आ.पडळकर यांच्या समवेत भूषणसिंहराजे होळकर, माउली हळणवर, सुभाष मस्के आदी उपस्थित होते.

चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन आ.पडळकर आणि भूषणसिंहराजे होळकर यांनी ढोल वाजवला. तसेच त्यांच्यासमवेत आलेल्या शेकडो ढोल वादकांनी देखील बिरोबाचा ढोल वाजवून ठेका धरला. त्यानंतर आ.पडळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना धनगर आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकारने त्वरित काढावा, अन्यथा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर ढोल वाजवून आंदोलन करू असा इशारा दिला.तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.