राज्यात MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आता निवळली असून येत्या २१ मार्च रोजी ही परीक्षा घेण्याचं राज्य लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, त्यानंतर देखील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी नियुक्त्या रखडलेल्या ४२० उत्तीर्ण उमेदवारांचा मुद्दा देखील उपस्थित केला. “सरकारची जत्रा अन् कारवाई सतरा असा या सरकारचा कारभार सुरू आहे. २१ तारखेला जर परीक्षा झाली नाही, तर मी या विद्यार्थ्यांसोबत वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसेन”, असं पडळकर म्हणाले. तसेच, करोना काळात परीक्षा न झाल्यामुळे परीक्षार्थींसाठी २ वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, अशी देखील मागणी पडळकरांनी केली आहे.

आणखी वाचा- मोठी बातमी! MPSC परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर

विद्यार्थी लादेन समर्थक होते का?

दरम्यान, गुरुवारी पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करत पडळकरांनी सरकारवर निशाणा साधला. “मुळात २०१९ला हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आलं आहे. या सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमपैकी विश्वासघात हा एक प्रोग्रॅम आहे. कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत, कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत, कधी शेतकऱ्यांच्या बाबतीत, कधी लाईट बिलाच्या बाबतीत. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा पुढे ढकलून सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेशी सरकार खेळतंय. माझ्यासोबत आंदोलनात असलेले विद्यार्थी लादेन समर्थक होते का? पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार का केला”, असं पडळकर यावेळी म्हणाले.

वडेट्टीवारांवरून साधला निशाणा!

विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेवरून देखील पडळकरांनी टीका केली. “सरकारमधले मंत्रीच म्हणत आहेत की परीक्षा पुढे ढकलायला नको. एक मंत्री म्हणतात माझ्या परवानगीशवाय निर्णय घेतला. महाराष्ट्र सराकारची जत्रा आणि कारवाई सतरा अशी परिस्थिती आहे का? सरकारनं काल सांगितलं कर्मचाऱ्यांच्या टेस्ट आणि इतर तयारी व्हायची आहे. याचा अर्थ हे सरकार गाफील होतं”, असं ते म्हणाले. “२१ तारखेला परीक्षा नाही झाली, तर वर्षाच्या समोर मी उपोषण करेन आणि विद्यार्थ्यांना घेऊन बसेन. या ७ दिवसांमध्ये जी मुलं सेंटरजवळ येऊन थांबली आहेत, त्यांना ७ दिवसांचा प्रत्येकी २० हजार रुपये भत्ता द्या. या मुलांची भाडं भरायची परिस्थिती नाही, त्यांचे खायचे वांदे आहेत. करोनामुळे परीक्षा पुढे ढकलली. त्यासाठी २ वर्ष वयोमर्यादा पुढे वाढवून द्यावी”, अशी मागणी देखील पडळकरांनी केली.