गोपीनाथगडावरील ‘स्वाभिमान दिनी’ जोरदार शक्तिप्रदर्शन होणार

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथगडावरील ‘स्वाभिमान दिवस’ कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या फलकावर पंकजा व प्रीतम मुंडे यांचेच छायाचित्र झळकले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह कमळ ही गायब झाल्याने दिवसभर माध्यमातून चर्चा रंगली. दरम्यान, दुपारी नव्याने लावण्यात आलेल्या फलकांवर फक्त ‘कमळ’ फुलले. तर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी हा पक्षाचा कार्यक्रम नसल्यामुळे नेते आणि चिन्हाचा संबंध येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. समर्थकांनी ‘आमचं ठरलयं. जय महाराष्ट्र’ अशा पोस्ट समाज माध्यमातून प्रसारित केल्याने पंकजा गुरुवारी काय बोलणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

बीड जिल्ह्यतील परळी येथे गोपीनाथगडावर गुरुवारी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमान दिवस कार्यक्रम होत आहे. परळी मतदार संघातील पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समाज माध्यमातून प्रसारित केलेल्या मजकुरात पुढे काय करायचे, कोणत्या मार्गाने जायचे, आणि मावळ्यांनो या असे आवाहन केल्याने पंकजा पक्षात नाराज असून त्या वेगळा निर्णय घेण्याच्या चच्रेने गोंधळ उडाला आहे. पक्षाच्या मराठवाडा आढावा बठकीलाही पंकजा यांनी दांडी मारली. प्रसारमाध्यमांना एक दिवस वाट बघा, असे सांगत भूमिकेबाबतची संदिग्धता वाढवली आहे. कार्यक्रमासाठी शहरात लावण्यात आलेल्या फलकांवर दिवंगत मुंडे आणि पंकजा व प्रीतम या भगिनींचेच छायाचित्र झळकले. फलकावरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह कमळाचे चिन्हही गायब झाल्याचे दिसल्याने माध्यमातून दिवसभर चर्चा रंगली. दुपारी खासदार प्रीतम मुंडे यांनी हा कार्यक्रम जयंतीचा आहे. येथे पक्षाचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देत दिवंगत मुंडे यांना मानणारे सर्व पक्षातील नेते, कार्यकत्रे येतात असे सांगितले. दुसरीकडे मात्र दुपारनंतर नव्याने लावण्यात आलेल्या फलकांवर फक्त ‘कमळ’ फुलल्याचे दिसून आले. त्यामुळे कथित पक्षांतराच्या चर्चाना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

पंकजा यांनी रात्री समाज माध्यमातून पुन्हा एकदा ‘स्वाभिमान दिवसाला तुम्ही या. मी वाट पाहते’ अशी पोस्ट टाकून समर्थकांना मोठय़ा संख्येने येण्याची साद घातली आहे. विधानसभेतील पराभवानंतर पहिल्यांदाच गोपीनाथगडावरील कार्यक्रमात पंकजा बोलणार असल्याने राज्यभरातील मुंडे समर्थक नेते व कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. या कार्यक्रमात पंकजा काय बोलतात, याबरोबरच किती नेते आणि लोक जमतात, यावरही पंकजा यांची पक्षांतर्गत वाटचाल आणि प्रभाव स्पष्ट होणार आहे.