भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे प्रतिपादन; परळीतील गोपीनाथगडाचे उद्घाटन

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ लोकांच्या प्रेमातून उभारलेला गोपीनाथगड गरीब माणसाला संघर्षांची आणि सत्ताधाऱ्यांना उपेक्षितांसाठी काम करण्याची प्रेरणा देईल, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली.
जिल्ह्य़ातील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात उभारलेल्या गोपीनाथगडाचे उद्घाटन अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री, प्रज्ञा मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे उपस्थित होते. मुंडे यांच्या २२ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले.
शहा म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांना राज्याचे, देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात भाजपला वैभव मिळाले. उपेक्षित समाजासाठी त्यांनी कायम संघर्ष केला. त्यामुळे गोपीनाथगड हा गरीब माणसाला संघर्षांची, सत्ताधाऱ्यांना उपेक्षितांसाठी कामाची प्रेरणा देईल असे शहा यांनी स्पष्ट केले.

‘गोपीनाथगडावरूनच
आता राजकीय भाष्य’
भगवानगडावरून यापूर्वी कोणतेही राजकीय भाष्य होणार नाही आणि भगवानगड सर्वासाठीच खुला राहील, असे महंत नामदेवशास्त्री यांनी या वेळी सांगितले. यापूर्वी या गडावर काहींवर (धनंजय मुंडे यांच्यावरील दगडफेकीचा संदर्भ!) दगडफेक झाली. मात्र, या प्रकारामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर बोलताना भगवानगड धार्मिक आहे. यापुढे हा गड सर्वासाठी खुला राहील, असे सांगत अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांनाही गडावर सन्मान मिळेल, असे त्यांनी सुचविले. पंकजा मुंडे यांचे राजकीय भाष्य यापुढे गोपीनाथगडावरूनच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद जोशींचे विस्मरण!
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे सकाळी निधन झाले. दुपारी गोपीनाथगडाच्या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, माजी आमदार पाशा पाटेल यांच्यासह भाजपचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, १८ मंत्री, नेते आवर्जून उपस्थित होते. मात्र, शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या जोशी यांच्या निधनाबाबत कार्यक्रमात शब्दही उच्चारला गेला नाही.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ बीड जिल्ह्य़ातील परळीत उभारलेल्या गोपीनाथगडाचे उद्घाटन शनिवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या उपस्थितीत झाले.