भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला होता, त्याबाबत आपले त्यांच्याशी बोलणेही झाले होते , पण ऐनवेळी त्यांचा काँग्रेस प्रवेश थोडक्यात राहिला, असा गौप्यस्फोट राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज येथे केला. भगवानगडावर आयोजित भगवानबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यास आज  सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे हे उपस्थित होते. यावेळी राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या फिरक्या घेतल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
भुजबळ यांनी गडाच्या विकासासाठी शासनाच्या वतीने दोन कोटीरुपये तर कदम यांनी गडाच्या विकासासाठी वनखात्याची १४ एकर जमीन देण्याची घोषणा केली. केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी पुढील निवडणुकांनंतर राज्याचे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे असतील अशी भावना व्यक्त केली. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘मुंडेंचा अडचणीचा काळ आता संपला आहे. त्यांचा व माझा जुना संबंध आहे. ते माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. कोणाच्या नशीबात पुढे काय आहे ते आपण सांगू शकत नाही. मात्र ते मोठे झाल्यास आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत.’ पुढील महिन्यात होणाऱ्या सहकारी संस्थांच्या घटनादुरुस्तीत मुंडे प्रतिनिधीत्व करत असणाऱ्या ओबीसींना राज्य शासन आरक्षण ठेवेल असे ते म्हणाले. एकनाथ खडसे म्हणाले की, मुंडे हे जातीपातीच्या राजकारणाच्या पलिकडील नेते आहेत. त्यांना उज्ज्वल भविष्य आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. पुढील वेळेस तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील व आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू.  पतंगराव कदम यांनी मुंडे व भुजबळ यांना चांगलेच चिमटे काढत उपस्थितांचे मनोरंजन केले.पतंगराव कदम म्हणाले की, भगवानबाबांनी आयुष्यभर शिक्षणाचा प्रसार केला. बाबांचे सर्व चरित्र आपणास माहित आहे. महापुरुषांना जात नसते. मुंडे यांना भगवानबाबा तर भुजबळांना म. फुले समजलेच नाहीत. भुजबळांनी फुलेंना फक्त माळ्यांचा करून टाकला तर भगवानबाबा हे काँग्रेस विचारधारा मानणारे होते हे मुंडे ना अजून माहित नाही. बाबांना फक्त वंजारी समाजाचे करू नका, आज आपण गुदमरलेले भुजबळ येथे पहात आहोत मात्र आपल्याला असे भुजबळ पहायची सवय नाही. मुंडेचा काँग्रेस प्रवेश ठरला होता. आपले यांच्याशी बोलणेही झाले होते. पण प्रत्यक्षात हा प्रवेश फलद्रुप होऊ शकला नाही. ते पुढे म्हणाले की भाजपला आम्ही जातीपातीचा पक्ष म्हणतो मात्र भाजपाला मुंडे नी बहुजन पक्ष बनवला. ते आपले जावाभावाचे मित्र आहेत. असा मित्र होणे नाही व मिळणे नाही. गडाच्या विकासासाठी १४ एकर जमीन आपण देऊ मात्र विकासासाठी भुजबळांनी मदत करावी.
 भुजबळ म्हणाले की, ‘या ठिकाणी राजकारणावर बोलायला आपण आलो नाही, मात्र मुंडेंना वंजाऱ्यांचा तर आपल्याला माळ्याचा करू नका. चौंडी, भगवानगड व पुण्याची समता भूमी एक मनाने एकत्र आली तर काय होईल ते लक्षात घ्या. दुर्दैवाने ते होत नाही ते जाऊ द्या. मात्र मी माळी म्हणून तर मुंडे वंजारी म्हणून भांडत नाही हे लक्षात घ्या. मी छोटा कि मोठा ते जाऊ द्या पण दुष्काळी परिस्थितीत लोकांचे अश्रू पुसणारा मुख्यमंत्री हवा. कदम लोकांचे अश्रू पुसतील अशी आशा आहे.’
 मुंडे यांनी सांगितले की, ‘आपल्याला पुन्हा खासदार व्हायचे आहे. मात्र आपण राज्यातही लक्ष देऊ. व्यासपीठावर बसलेले सर्वच मुख्यमंत्री व्हायच्या पात्रतेचे आहेत. मात्र त्यांना जमले नाही तर मग माझा विचार अवश्य करा. पतंगराव आज मूडमध्ये आहेत. भुजबळ माझे मोठे बंधू आहेत. कदम यांना भुजबळ गुदमरलेले वाटत असले तरीही ते तसे नाहीत ते टायमींगची वाट पहात आहेत. मला बाबा तर भुजबळ यांना फुले कळले नसतील मात्र आम्ही दोघेही बाबा व फुलेंचे भक्त आहोत. आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, पण आमचे हक्क आम्हांला द्या नाहीतर संघर्ष करू. एकाही घोटाळ्यात ओबीसी नेता नाही हे लक्षात घ्या. भुजबळ उभे राहिले की,  द्या टाळी अन पाडा माळी ही कोणती घोषणा याचा विचार करा. भगवान बाबा काँग्रेसला मानणारे होते हे कदम यांनी उशीरा सांगितले.’ कार्यक्रमास गडाचे महंत नामदेव शास्त्री, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, राम शिंदे, माजी आमदार पाशा पटेल, विश्वस्त गोविंद घोळवे, पुरुषोत्तम खेडकर, महादेव जानकर, गोविंद कुलकर्णी, माजी खासदार सुभाष देशमुख हे उपस्थित होते.