मराठवाडय़ात महाविजयाचा ‘षटकार’ लगावणाऱ्या महायुतीच्या दिग्गजांना आता केंद्रातील मंत्रिपद खुणावू लागले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, तसेच सलग विजयाचा ‘चौकार’ लगावणारे जालन्याचे रावसाहेब दानवे व औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. मुंडेंना केंद्रात कृषिमंत्रिपद देणार असल्याचे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनीच बीडच्या प्रचारसभेत जाहीर केले होते, मात्र अन्य कोणाला मंत्रिपद देण्याचा विचार झाल्यास खैरे व दानवेंची नावेही चर्चेत असल्याचे सांगितले जाते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारमध्ये मराठवाडय़ातील दोघांनी मंत्रिपद भूषविले होते. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याकडे कॅबिनेट व जयसिंग गायकवाड यांच्याकडे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. या दोघांच्या रूपाने एकाच वेळी बीडला दोन मंत्रिपदे मिळाली. त्याआधी जनता दलात पहिल्यांदा फूट पडल्यानंतर केंद्रात काँग्रेसच्या पाठिंब्याने अल्पकाळासाठी सत्तेत आलेल्या पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात बीडचे तत्कालीन जनता दल खासदार बबनराव ढाकणे यांच्या रूपाने बीडला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत एनडीए सरकारमध्ये मुंडे यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मानले जाते. बीडच्या प्रचारसभेत अध्यक्ष राजनाथ सिंग यांनीच जाहीर केल्याप्रमाणे मुंडे यांच्याकडे कृषी खात्याची धुरा सोपविली जाईल, असे दिसते.
काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये (२००४-२००९) मराठवाडय़ातून काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर यांनी केंद्रात मंत्रिपद भूषविले. विशेष म्हणजे त्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये धक्कादायक पराभव होऊनही सोनिया कृपेने पाटील यांना थेट गृहमंत्रिपदाची धुरा सोपविली गेली. त्यानंतर यूपीएच्या दुसऱ्या (मागील) पंचवार्षिकमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या रूपाने लातूरलाच पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली, मात्र विलासरावांच्या अकाली निधनानंतर मराठवाडय़ातील अन्य कोणाला केंद्रात मंत्रिपद मिळू शकले नव्हते.