गोपिनाथराव मुंडेंच्या सानिध्यात कोणी आला तर त्या व्यक्तीमध्येही नेतृत्व गुण तयार होत होते इतकी ताकद त्यांच्यात होती. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला नेतृत्व करायला त्यांनी शिकवलं. गोपिनाथरावांमुळेच आमच्यासारखे नेते घडले, त्यामुळे आज भाजपाचे यश पहायला ते हवे होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त गोपिनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, देशात युतीला मोठं यश मिळालं याचं श्रेय खऱ्या अर्थान मोदींना आहे. मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबवल्यामुळे हे यश मिळाले. जनतेच्याही हे लक्षात आलं त्यामुळे त्यांनी मोदींच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. याचं श्रेय जसं मोदींना आहे तसेच गोपिनाथराव मुंडेंनाही आहे. कारण, त्यांनीच आमच्या सारख्यांच नेतृत्व घडवलं.

मुंडे साहेबांच स्वप्न होतं की मराठवाड्ातील आठही खासदार भाजपाचे असतील मात्र, आम्ही सातपर्यंत पोहोचलो आहोत. केवळ एकाच जागी केवळ चार हजार मतांनी पराभूत झालो. संभाजीनगरची जागा आम्हाला मिळाली असतील तर मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं असतं. मात्र, आता पुढच्या वेळी आठही जागा जिंकून त्या मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करु, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे गोपिनाथराव मुंडेंचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यासाठी मराठवाड्यातला नद्या जोड प्रकल्प मोदींच्या नेतृत्वाखील पूर्ण करु, गोदावरी खोऱ्यात पाणी आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या जनतेला दिली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मराठवाड्यातील धऱणं पाईपच्या माध्यमांतून जोडणार आहोत त्यानंतर सिंचनाच्या माध्यमातून पाणी सर्वत्र पोहोचेल. यासाठीचा वॉटर ग्रीडचा आराखडाही तयार आहे. इस्त्रायलला याचं काम देण्यात आलं आहे. यासाठी कितीही पैसे लागले तरी खर्च करु.