नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा निघाला असतानाच दुसरीकडे सिंचन घोटाळ्या प्रकरणी नागपूरमध्ये ४ गुन्हे दाखल झाले आहेत. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले असून यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणातून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील सुमारे २ लाख ५० हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील जनता ३० वर्षांपासून जास्त काळ शेतीला पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. राज्यातील सिंचन घोटाळ्यात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचाही समावेश होता. सिंचन प्रकल्पांमधील गैरव्यवहारावरुन भाजपने विरोधी पक्षात रान उठवले होते. यावरुन त्यांनी आघाडी सरकारची कोंडी देखील केली होती. सत्तेवर आल्यावर कोकणातील सिंचन प्रकल्पांची चौकशी पुढे सरकली होती. काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे देखील झाले होते. मात्र, विदर्भातील प्रकल्पाबाबत संथगतीने चौकशी सुरु होती.

अखेर मंगळवारी नागपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार गुन्हे दाखल केले आहे. आरोपींमध्ये नेमका कोणाचा समावेश आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीला हादरा देण्यासाठीच ही कारवाई केली की काय अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरु आहे. विशेष म्हणजे विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामांच्या निविदा तत्कालीन सरकारच्या काळात देण्यात आल्या असल्या तरी त्यापैकी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाची कामे भाजपचे खासदार आणि आमदारांच्या कंपन्यांना केली आहेत.