रायगड जिल्ह्य़ात गौरी-गणपतींचे सोमवारी विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते आहे.
जिल्ह्य़ात ९१ सार्वजनिक तर ५१ हजार ११५ घरगुती गणपतींचे तर १ हजार ३७५ गौरींचे विसर्जन करण्यात येणार आहे. अलिबाग, उरण, मांडवा, आक्षी, मुरूड, श्रीवर्धन आणि रेवदंडा येथील समुद्रकिनाऱ्यावर गणेशविसर्जन करण्यात येणार आहे. तर इतर ठिकाणी नदी आणि तलावांमध्ये गौरी-गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. सध्या कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. मुंबईकर चाकरमानी मोठय़ा संख्येने कोकणात आले आहेत. गणपतीपाठोपाठ आता गौराईचेही शनिवारी आगमन झाल्याने गणेशोत्सवाचा उत्साह टिपेला पोहचला आहे. कोकणात तेरडय़ाच्या वनस्पतीची गौर आणली जाते. सायंकाळच्या सुमारास मुलींनी रानमाळावर जाऊन वाजतगाजत तेरडय़ाच्या गौरी आणल्या. त्यानंतर गौरी सजविण्यात आल्या. दागदागिन्यांनी मढविण्यात आल्या. त्यांची पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर गौराईला भाजी-भाकरी आणि दह्य़ाचा नवेद्य दाखविण्यात आला. रात्री गौराईच्या पुढे महिलांची नाचगाणी झाली. एकूणच गौराई आल्याने महिलावर्गात उत्साहाला उधाण आले आहे. रविवारी गौराईंचे पूजन केल्यानंतर सोमवारी त्यांचे वाजतगाजत मिरवणुकीने जाऊन विसर्जन केले जाणार आहे.
विसर्जन मिरवणुकांच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी चार वाजल्यापासून गणपती विसर्जनाला सुरुवात होणार आहे.