कायम विनाअनुदानित तत्त्वावर सरकारची मान्यता
पुणे : शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी राज्यातील विविध विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात १२० नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे. राज्य सरकारने कायम विनाअनुदानित तत्त्वावर या महाविद्यालयांना मान्यता दिली असून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांसह काही व्यावसायिक अभ्यासक्रम या महाविद्यालयांमध्ये राबवले जातील.
विद्यापीठ कायद्यानुसार नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्यभरातील संस्थांकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्या प्रस्तावांची छाननी करून सरकारने ही महाविद्यालये सुरू करण्यात मान्यता दिली. त्या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. नव्या महाविद्यालयातील सर्वाधिक महाविद्यालये मुंबई, पुणे, औरंगाबाद, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात सुरू होणार होतील. मात्र, संबंधित महाविद्यालयांनी भविष्यात कधीही अनुदान न मागण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यावर त्यांना विद्यापीठांची संलग्नता देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
नव्या महाविद्यालयांना मान्यता देतानाच सरकारने अन्य महाविद्यालयांतील काही तुकडय़ा, नव्या विषयांसाठीही मंजुरी दिली आहे. त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासह नवे विषयही शिकण्याची संधीही मिळेल.
विद्यापीठनिहाय नवी महाविद्यालये
’ मुंबई विद्यापीठ – २२
’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – १७
’ पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर – २
’ शिवाजी विद्यापीठ – ४
’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद – २२
’ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – ५
’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ – ८
’ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड – ५
’ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव – ३
’ एसएनटीडी विद्यापीठ मुंबई – ५
’ कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ – २७
First Published on June 20, 2019 3:41 am