ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईतील मतदारांना भुलविण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरु केले असून शहरातील सिडको वसाहतींसोबत आता खासगी वसाहतींमध्ये रहाणाऱ्या सुमारे ५० हजार कुटुंबांना यापुढे महिन्याला अवघ्या ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी पुरविण्याचा खुशामतखोर निर्णय शुक्रवारी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेवकांनी बहुमताने घेतला. यापुर्वी सिडको वसाहतींमध्ये रहाणाऱ्या ५२ हजार कुटुंबांना याच प्रमाणात पाणीबिलाची आकारणी होत असल्यामुळे नवी मुंबई परिसरात पाण्याची मोठी नासाडी सुरु असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. असे असताना खासगी वसाहतींमधील ५० हजार कुटुंबांनाही पाणी बिल आकारणीचा हाच ‘पॅटर्न’ लागू करत सुमारे एक लाख कुटुंबांवर स्वस्त दरातील पाण्याचा वर्षांव करुन मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.
मुंबईनंतर स्वतच्या मालकिचे धरण असलेली महापालिका म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक आहे. खालापूर तालुक्यातील मोरबे धरणातील मोठय़ा पाणीसाठय़ाच्या जोरावर नवी मुंबईकरांना वाट्टेल त्या दराने पाणी पुरवण्याचा विडाच महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने उचलला आहे.
यामुळे पाण्याची नासाडी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सिडको वसाहतींमधील रहिवाशांना प्रत्येक महिन्यासाठी ३० हजार लिटर पाणी वापरासाठी ५० रुपये इतकेच बिल आकारण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेसने घेतला होता. या निर्णयाचा फायदा निवडणुकीत या पक्षाला मिळाला. ३० हजार लीटर पाणी वापरापर्यंत जेमतेम २५० रुपये इतकेच पाणी बिलाची आकारणी होत असल्यामुळे सिडको वसाहतींमध्ये प्रती माणसी ३५० लिटर इतका पाण्याचा वापर सुरु झाला आहे. राज्य सरकारच्या निकषानुसार प्रत्येक नागरिकाला प्रती दिवशी १५० लिटर इतके पाणी पुरेसे असते. असे असताना नवी मुंबईतील सिडको वसाहतींमध्ये हे प्रमाण २५० ते ३५० लिटरच्या घरात पोहचले आहे. राज्यभर दुष्काळाच्या झळा जाणवत असतानाही एप्रिल-मे महिन्यात नवी मुंबईत पाण्याची अशाच प्रकारे नासाडी सुरु होती. सत्ताधाऱ्यांनी आखलेला कमी बिलाच्या योजनेमुळे पाण्याचा अमर्याद वापर सुरु झाल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. या पाश्र्वभूमीवर ३० हजार लिटर पाणी वापराची मर्यादा कमी करुन ती २२ हजार ५०० लिटपर्यंत आणली जावी. जेणेकरुन पाण्याची नासाडी कमी होईल, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शुक्रवारी सर्वसाधारण सभेपुढे मांडला होता.
मात्र, तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला. शिवाय सिडको वसाहतींसोबत खासगी वसाहतींमध्ये रहाणाऱ्या ५० हजार कुटुंबांनाही ३० हजार रुपयांमध्ये महिन्याला ५० हजार लिटर पाणी, असे नवे खुशामतखोर धोरण मंजुर केले. ३० हजार लिटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर झाल्यास प्रती हजार लिटरमागे चार रुपये ५० पैसे अशी दर आकारणी केली जाणार आहे.