खोलसापाडा धरण टप्पा क्र.२ च्या कामामध्ये शासकीय दिरंगाई

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई-विरार महापालिकेने प्रस्तावित केलेल्या खोलसापाडा धरण योजनेच्या टप्पा क्रमांक २ च्या कामाला शासकीय दिरंगाईमुळे विलंब होत असल्याने योजनेचा खर्च १५ कोटी रुपयांची वाढला आहे. या मूळ योजनेचा खर्च ३५ कोटी रुपये होता आता तो वाढून ५२ कोटी एवढा झाला आहे. पालिकेने योजनेसाठी शासनाकडे १२ कोटी रुपये वर्ग केले असले तरी वनखात्याच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे.

वसई विरार शहराची लोकसंख्या पालिकेच्या आकडेवारीनुसार २४ लाख एवढी आहे.  शहराला दररोज २३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा महापालिकेमार्फत केला जातो. त्यामध्ये सूर्या धरण टप्पा १ व ३ मधून एकूण २०० दशलक्ष लिटर , उसगाव २०,  पेल्हार १०  आणि पापडखिंड १ दशलक्ष लिटर अशा प्रकारे पाणीपुरवठा केला जात आहे. वसई विरार शहराला भविष्यातील पाण्याची गरज ओळखून वेगवेगळ्या योजनांवर काम सुरू आहे. त्यापैकी उसगाव जवळील खोलसापाडा धरणांचे समावेश आहे. खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ अशा दोन स्वतंत्र योजना असून त्या दोन्ही योजनांच्या टप्प्यातून पालिकेला ७० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. टप्पा क्रमांक २ मध्ये दररोज २० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. लघुपाटबंधारे खात्यामार्फत ही योजना राबविण्यात येणार होती. या योजनेसाठी पालिका निधी उपलब्ध करून देणार आहे. योजना जाहीर झाली तेव्हा योजनेचा खर्च हा केवळ ३५ कोटी रुपये होता. आता विलंब लागल्याने योजनेच्या खर्चात १५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे योजनेचा खर्च हा ५२ कोटी रुपये एवढा झाला आहे. दरम्यान, या योजनेसाठी जलवाहिन्या वनविभागाच्या जागेतून जाणार असल्याने त्या जागा हस्तांतरित करण्यासाठी पालिकेने वनखात्याला १२ कोटी रुपये देखील भरले आहे. या योजनेसाठी केंद्रीय वन आणि पर्यांवरण खात्याची मंजुरीदेखील मिळाली आहे. वनखात्याची मंजुरी मिळाल्यानंतर योजनेच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

खोलसापाडा धरण टप्पा क्रमांक १ ला यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. पंरतु टप्पा दोन हा लहान असून त्याचे काम लवकर पुर्ण व्हावे यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार शासकीय दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. जेणेकरून योजनेचे काम लवकर पुर्ण होऊन शहराला अतिरिक्त २० दशलक्ष लिटर्स पाणी मिळू शकेल. पालिकेने यासाठी ठेकेदाराचीही नियुक्ती केली आहे. वनखात्याचा अडसर दूर झाल्यानंतर दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. खोलसापाडा धरणांची पूर्ण मालकी पालिकेची असणार आहे. अशा प्रकारे मालकीचे हे दुसरे धरण ठरणार आहे. यापूर्वी पालिकेच्या मालकीचे विरार येथील पापडखिंड धरण असून त्यातून दररोज १ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो.

खोलसापाडय़ाचा पहिला टप्पा ११० कोटींचा

खोलसापाडा धरण योजनेअंतर्गत दोन टप्पे असून पहिला टप्पा हा ११० कोटींचा आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याल २०१९ मध्ये महासभेने प्रशासकीय मंजुरी दिली होती. या योजनेतून शहरातील पाण्याचा प्रश्न सुटणार असून या योजनेच्या माध्यमातून पाण्याची साठय़ाची व्याप्ती ही ७.८० चौ.कि.मी असून या क्षेत्रात एकूण पाणी साठा १३ हजार ६४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असणार आहे. त्यातून पिण्यासाठी दररोज ५० दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होणार आहे. पाटबंधारे विकास महामंडळाकडून या कामाचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण मालकी व या धरणातील पाणी पालिकेसाठी आरक्षित राहणार आहे. तर या प्रकल्पातून उचलण्यात येणारे स्वामित्व धन महानगरपालिकेकडून घेऊ नये व यावर पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे.

खोलसापाडा धरण टप्पा २ चे काम अंतिम टप्प्यात आहे. मधल्या काळात विलंब झाल्याने योजनेचा खर्च १५ कोटींनी वाढला आहे. आम्ही शासनाकडे १२ कोटी रुपये वर्ग केले आहेत. वनखात्याच्या अंतिम मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

-शंकर खंदारे, उपायुक्त, पाणीपुरवठा विभाग, वसई-विरार महापालिका