तीन वर्षांतून एकदा दुष्काळ पडत असल्याने यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठीच आपण दुष्काळी दौऱ्यावर असून, यापुढे दुष्काळी परिस्थिती ओढवू नये, म्हणून शाश्वत उपाययोजनांसाठी दुष्काळी भागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्यात भाजपा कार्यकर्त्यांची मतेही विचारात घेतली जाणार असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी सांगितले. दुष्काळी माण, खटावचा शेतकरी कणखर असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. म्हसवड येथे ते बोलत होते.
भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, संतोश हिरवे, अरूण कट्टे, तुकाराम ठोंबरे, डॉ. राजेंद्र खाडे उपस्थित होते.
व्यास म्हणाले, की मराठवाडा, विदर्भाप्रमाणेच माणमधील दुष्काळी परिस्थिती असूनदेखील येथील शेतकरी दुष्काळाचा सामना मोठय़ा हिमतीने करत आहेत. ही मोठी कौतुकाची बाब आहे. येथील पर्जन्यमान खूपच कमी असतानादेखील येथील शेतकरी कमी पाण्यावर पिके घेऊन आपली शेती पिकवत असून त्यांचा हा आदर्श राज्यातील इतर शेतकऱ्यांनी घेऊन शेती केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितच थांबतील, असा मला विश्वास वाटतो.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होतोय की नाही यासाठीच मी हा दुष्काळी दौरा मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सुरू केला. या दौऱ्याचा नेमका परिणाम पुढील महिन्यात दिसेल. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे रब्बी अन् खरिपाचे अनुदान जाहीर केले आहे. मात्र माणमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या वेगवेगळय़ा रकमेत दिले असून,अनुदानाचा हा घोळ येथील तलाठय़ांनी केलेला आहे. माणमध्ये रेशनिंग दुकानदारही मोठय़ा प्रमाणात घोटाळे करत असल्याचे माझ्या निदर्शनास आले असून, शासकीय योजना हे दुकानदारच हडप करत असल्याची येथील वस्तुस्थिती आहे. अशा घोटाळेबाज रेशन दुकानदारांची आपणाकडे यादी आली असून, त्यांच्यावर कारवाई ही अटळ आहे. दुष्काळ निवारणासाठी येथील महसूल यंत्रणेने कोणकोणते उपाय योजले असून, याचा सविस्तर अहवाल आपण तहसीलदारांकडून मागविला असून, यामध्ये कामात कसूर आढळून आल्यास त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून माणमध्ये काही बंधाऱ्यांची कामे गत सहा ते आठ महिन्यापूर्वी झाली आहेत. त्या बंधाऱ्याच्या कामाला आम्ही भेट दिली असता यामध्ये काही बंधाऱ्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची झाल्याची गंभीर बाब समोर आली असून, या बंधाऱ्यांच्या ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी व संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.