नव्या पेन्शन योजनेला विरोध आणि जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्याने यवतमाळ ते ठाणे असा सायकल प्रवास सुरु केला आहे. प्रवीण बहादे असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तो तब्बल 700 किमी सायकल प्रवास करणार आहे. प्रवीण बहादे यवतमाळ जिल्हा परिषदेत लिपिक म्हणून कार्यरत आहे. 18 सप्टेंबरला यवतमाळमधून सायकल प्रवासाला सुरुवात झाली असून १ ऑक्टोबरला ठाण्यात पोहोचणार आहे.

१ नोव्हेंबर २००५ सालानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना १९८२ व ८४ सालची जुनी पेन्शन योजना बंद करून नवी पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू करण्यात आली आहे. मात्र नव्या पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. कर्मचाऱ्यांचे भविष्यच अंधारात जाणार असल्याने जुनीच योजना लागू ठेवण्याची संघटनेची मागणी आहे.

नव्या योजनेत शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारातून कापण्यात येणाऱ्या रक्कमेचा तपशील शासनाकडे उपलब्ध नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. तसंच नव्या योजनेत कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पुरेसे संरक्षण नसल्याचा संघटनेचा आरोप आहे.

विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला होता. मात्र अद्यापही त्यांना दिलासा मिळालेला नाही. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.