मूकबधिर बांधव, दिव्यांग बांधव आपल्या हक्कांसाठी लढत असताना त्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. निष्ठुर निर्दयी, पाषाणहृदयी सरकार गेलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे.

पुण्यातली समाज कल्याण आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या दिव्यांग बांधवांच्या मोर्चावर पुणे पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला. याच घटनेचा निषेध जितेंद्र आव्हाड यांनी नोंदवला आहे. हा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी हे सरकार गेलंच पाहिजे असं आवाहन केलं आहे.

पहा व्हिडिओ

आत्तापर्यंत हे सरकार बोलणाऱ्यांचा आवाज दाबत होतंच. आता मात्र हद्द झाली, मूकबधिर, दिव्यांग बांधव त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. असं असताना त्यांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवायला हवा होता, त्यांना धीर द्यायला हवा होता. ही भाषा त्यांना नक्कीच समजली असती. मात्र या मुर्दाड सरकारने त्यांच्या पाठीवर लाठ्या चालवल्या. असंवेदनशीलतेची हद्द या सरकारने ओलांडली आहे. या सरकारला अजिबात कोणाचीही दयामाया नाही. ज्यांना बोलून स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, ज्यांना कठोरातला कठोर आवाज ऐकू जात नाही अशा मुलांवर काठ्या चालवण्याचं काम या सरकारने केलं आहे. हे सरकार गेलंच पाहिजे असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे.

आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या मूकबधिर मुलांच्या मागण्या ऐकून न घेता त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या सरकारला या मुलांचा शाप लागेल अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य शासनावर सडकून टीका केली. तसेच तुमच्या मागण्या मी स्वतः मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन असे आश्वासनही त्यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले. तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या लाठीचार्ज प्रकरणी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकार हे जनरल डायरचं सरकार असल्याचीही टीका केली आहे.