पालघरमधील माता-बाल संगोपन केंद्राची इमारत धोकादायक

पालघर : पालघर येथील माता- बाल संगोपन केंद्राची इमारत धोकादायक ठरली असल्याने पैठण धर्तीवर ग्रामीण रुग्णालय आणि आरोग्य पथकाचे एकत्रीकरण करून हंगामी नागरी रुग्णालय (मिनी सिव्हिल हॉस्पिटल) उभारण्याचे स्वप्न भंग पावले आहे. या धोकादायक इमारतीत सुरू असलेले प्रसूतिगृह व आंतर रुग्णालय कक्षाला अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.

पालघर येथे जिल्हा निर्मिती होऊन पाच वर्षांचा कार्यकाळ झाला असला तरीही जिल्हा शल्य रुग्णालयाची उभारणी करण्याचे काम अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी ठाणे मुंबई येथे पाचारण करावे लागत आहे. तसेच अनेक रुग्ण हे गुजरात राज्यातील वलसाड व वापी येथे उपचार घेण्याचे पसंत करत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यतील रुग्णांची सोय व्हावी तसेच आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असलेल्या ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय व सर जे.जे. समूह रुग्णालय संचालित पालघर आरोग्य पथकाच्या जागेमध्ये तसेच या विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय क्षेत्र व मनुष्यबळाची सांगड घालून एकत्रितपणे हंगामी नागरी रुग्णालय(शल्य) स्थापन करण्याचे विचाराधीन होते. या दृष्टीने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर  जे. जे. रुग्णालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि इतर विभागाच्या पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चाही केली होती.

याबाबतचा प्रस्ताव करण्याचे काम सुरू असताना इमारतीच्या तपासणीचा अहवाल तपासला असता ही इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या आरोग्य पथकाकडून याच धोकादायक इमारतीमध्ये प्रसूतिगृह चालवले जाते. ते १९४८मध्ये बांधले असून माता-बाल संगोपन

केंद्राची इमारत धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने एका पाहणीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे निमसरकारी रुग्णालय स्थापन करण्याऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर २० खाटांचा नवीन वॉर्ड स्थापन करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर केला जात आहे.

प्रसूतिगृह धोकादायक इमारतीतच

ग्रँट मेडिकल महाविद्यालय व सर जे. जे समूह वैद्य्कीय महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या प्रसूतिगृहाची इमारत धोकादायक ठरवली गेली असली तरीही या ठिकाणी दर महिन्याला ६५ ते ७० प्रसूती होत असल्याची माहिती पुढे आली आहे. याच विभागाकडे अस्तित्वात असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या निवासी इमारतीची दुरुस्ती व डागडुजी करून त्या ठिकाणी हे प्रसूतिगृह स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. या कामासाठी तीन कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरीही निधी अजूनही या नूतनीकरणाच्या कामाला आरंभ झाला नाही. परिणामी धोकादायक इमारतींमध्ये दंत चिकित्सा, लसीकरण, एनसी क्लीनिक तसेच प्रसूतिगृह सुरू ठेवणे गरजेचे झाले आहे.

स्थलांतरित करणार?

पालघर ग्रामीण रुग्णालयात नवीन मजल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या धोकादायक इमारतीमधील प्रसूतिगृह व आंतररुग्ण विभाग नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार असून बाह्य विभाग तसेच कार्यालयीन कामकाज, प्रशिक्षण व इतर विभाग जागेच्या उपलब्धतेनुसार या जुन्या इमारतीत सुरू ठेवण्याचे प्रस्तावित आहे.