शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय रूग्णालयाचे स्थलांतर झाल्यानंतर या इमारतीत १०० खाटांचे रुग्णालय सुरु ठेवण्याचे आदेशअसतांना रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप महानगर भाजपने केला आहे. शासनाने चार डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश दिलेले असताना एकही डॉक्टर येथे फिरकत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी प्रशासनाच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले.
शहरातील जिल्हा रुग्णालयात भाडेतत्वावर वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय सुरू होते. परंतु जिल्हा रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय दोघांच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने महाविद्यालयाने चक्करबर्डी येथे स्वतची वास्तू बांधली. त्या ठिकाणी महाविद्यालयाचे रुग्णालय स्थलांतरीत करण्यात आले. शासनाने तीन ते चार महिन्यापूर्वी महाविद्यालय रुग्णालय स्थलांतराचे परिपत्रक काढले होते. त्यात शासनाने रूग्णांचे हाल होऊ नयेत. त्यासाठी १०० खाटांचे रुग्णालय जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. प्राथमिक उपचार इत्यादीसाठी त्या ठिकाणी चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली. चार वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये अभय शिनकर, दिनेश दहिते, रवि सोनवणे, कौस्तुभ पाटील यांचा समावेश आहे. या डॉक्टरांनी महाविद्यालय स्थलांतरीत झाल्यापासून एकदाही बाह्यरूग्ण विभाग कधी उघडला नाही. शस्त्रक्रिया कक्षात तर ते फिरकतही नाहीत. येणाऱ्या रुग्णांना साधा ताप, खोकला असेल तर चक्करबर्डी येथे पाठविण्यात येते. चारही वैद्यकीय अधिकारी कधीही जिल्हा रूग्णालयात येत नाहीत. त्यांना समज देऊन ताबडतोब जिल्हा रूग्णालय सुरू करण्यात यावे, तसेच रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून चक्करबर्डी येथे स्थलांतरीत झालेल्या महाविद्यालयाच्या रूग्णालयात रुग्णांना पोहचविण्यासाठी बस स्थानकातून तसेच जिल्हा रूग्णालयापासून बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे. निवेदन देताना विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, केदार मोराणकर, चंद्रशेखर गुजराथी, विनोद मोराणकर, ओम खंडेलवाल आदी उपस्थित होते.