पाणी बचतीसाठी विदर्भात ठोस योजना नाही
पावसाळा सुरू झाल्यानंतरही भविष्यातील पाणी बचतीच्या दृष्टीने विदर्भात कोणतीही ठोस योजना नसल्याने येणाऱ्या काळातही विदर्भाच्या काही जिल्ह्य़ांना पाणी टंचाईचा सामना करणे भाग पडेल, असेच चित्र आहे. गेल्या उन्हाळ्यापासून महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. मराठवाडय़ाचा पट्टा दुष्काळाने पोळल्याने शेती सोडून हजारो शेतकरी कुटुंबांना कामाच्या शोधात इतरत्र धाव घ्यावी लागली. लाखो पाळीव जनावरे छावण्यांमध्ये अजूनही बांधलेली आहेत. या पाश्र्वभूमीवर विदर्भात पाण्याच्या बचतीसाठी पारंपरिक आणि आधुनिक अशा ठोस योजना राबविण्याचे कोणतेही प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही.
विदर्भातील नद्यांची संख्या लक्षात घेता पाण्याचे नियोजन भविष्यातील टंचाईला तोंड देण्यासाठी अत्यावश्यक आहे. नागपूर जिल्ह्य़ात वर्धा, वैनगंगा, वेणा, कन्हान, पेंच, नांद आणि जामी या सात प्रमुख नद्या आहेत. गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक आठ प्रमुख नद्यांचे प्रवाह असून यात वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, पठाणी, खोब्रागडी, पामुलगौतम यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्य़ाला सहा नद्यांचे वरदान लाभले असून यात वर्धा, बधाडी, बोर, यशोदा, धाम, पोथरा आणि बाकडी या नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ांना तळ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते. परंतु, मामा तलाव, मालगुजारी तलाव, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, शिवकालीन पाणी साठवण पद्धत अशा पारंपरिक पद्धतींनाही आधुनिक काळात फारसे महत्त्व दिले जात नाही, ही गंभीर बाब असल्याचे मत जलतज्ज्ञ दीपकसिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.
ठाकूर यांच्या मते नद्यांचे प्रवाह रोखणे शक्य नाही. या नद्या उन्हाळ्यात आटत असल्याने त्या काळातच नदीच्या पात्रात ५० फूट आडवे आणि १० फूट रुंद व १० फूट खोल खड्डे प्रत्येकी ५० फुटांवर केल्यास नदीचे वाहून जाणारे पाणी जमिनीतच जिरवता येऊ शकते. प्रत्येक खड्डय़ात पाणी साठवले जाते. उन्हाळ्यातील टंचाईवर मात करण्यासाठी या पाण्याचा हमखास वापर करता आला असता. मात्र, सरकारी पातळीवर या योजनेची फारशी दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही नद्यांचे लाखो गॅलन पाणी वाहून जाणार आहे. ग्राम पंचायतींच्या मदतीने अशा योजना राबविणे शक्य आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.
शेतीसाठी बारा महिने पाणी मिळावे, यासाठी पॉलिथिन टँक आणि पॉलिथिन वाफे उपयुक्त ठरू शकतात. शेततळे खोदल्याने शेतकऱ्याची तेवढी जागा निरुपयोगी ठरते. यासाठी विहिरीच्या बाजूला किंवा धुऱ्यावर खड्डे करता येतील. या खड्डय़ांमध्ये ताडपत्री वा पॉलिथिन टाकून पाण्याची साठवण करता येऊ शकते आणि पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने शेती करून अशा खड्डय़ांमधील पाणी उर्वरित काळात मोटारपंपाने ओढून शेतीसाठी उपयोगी आणता येऊ शकते, अशी सूचनाही ठाकूर यांनी केली आहे. पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण व्हावे म्हणून शहरात बांधण्यात येत असलेल्या इमारतींना रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था करणे सक्तीचे असताना याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.