कोशेसरी-सोलशेत गावादरम्यान सूर्या नदीतून बोटीने धोकादायक प्रवास

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : कोशेसरी-सोलशेत गावादरम्यान सूर्या नदीवर पूल बांधण्याच्या ४६ गावांच्या मागणीकडे गेली २० वर्षे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना बोटीतून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात सूर्या नदीला महापूर येत असल्याने स्थानिकांचे अतोनात हाल होत आहेत.

डहाणू आणि विक्रमगड तालुक्याला सरळमार्गाने जोडणाऱ्या कोशेसरी येथील सूर्या नदीवर पूल बांधण्यासाठी तब्बल २० वर्षांपासून सातत्याने अर्ज, विनंती आणि पत्रव्यवहार केला जात आहे. डहाणू तालुक्यातील किन्हवली, दिवशी, गडचिंचले, कासा बुद्रुक, सायवन, कोशेसरी-भवाडी ग्रामपंचायत तर विक्रमगड तालुक्यातील तलवाडा, कहे-तलावली या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेतले आहेत. कवडास, कासा—बुद्रुक, कोशेसरी ग्रामस्थांना नदी पार करण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. जिल्हा परिषद सदस्य शैलेश करमोडा यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानंतर त्यादृष्टीने त्या भागाचे सर्वेक्षणही करण्यात आले.

सूर्या नदीच्या वाहतुकीवर डहाणू तालुक्यातील एकूण २९ महसूल गावे आणि विक्रमगड तालुक्यातील १७ महसूल गावे जोडली गेली आहेत. दोन्ही तालुक्यांना सरळमार्गाने जोडणारा पूल बांधल्यास सायवन, उधवा, दादरा-नगर हवेली आणि दिवशी, दाभाडी, किन्हवली, सायवनहून गांगोडी, शेणसरी मार्गे विक्रमगड असा थेट वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होईल. सध्या पूल नसल्याने कासा येथून ३० किलोमीटरचा वळसा घालून अंतर पार करावे लागत आहे.

कोशेसरीजवळील सूर्या नदीवर पूल बांधण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, आजवर मंजुरी मिळालेली नाही.

-धनंजय जाधव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम