नवीन सरकारचे कौतुक करावे असे चांगले काम अद्याप केले नाही. पण जलयुक्त शिवार, जलसंजाल (वॉटर ग्रीड), जनतेमधून थेट सरपंच निवड, अशा योजना, निर्णयांवर बंदी आणण्याच्या कामातच सरकार सध्या व्यस्त आहे, अशा शब्दांत माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. पाच वर्षं सत्तेच्या काळात विरोधकांनाच काय, पण शत्रूंनाही त्रास दिला नाही, असे सांगत त्यांनी चांगले काम केले तर शाब्बासकी देऊ, मात्र, वाईट काम केले तर सरकारला सरळ करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचा इशाराही दिला.

बीड येथे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयात त्या शुक्रवारी बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी आमदार केशव आंधळे, आदिनाथराव नवले, रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे आदि उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडीच महिन्यांनंतर पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, पाच वर्षं चांगले काम केले. मंत्री म्हणून सत्कार घेत कोठे फिरले नाही. प्रत्येक क्षण जिल्ह्यच्या विकासासाठी दिला. मात्र अभ्यास कितीही चांगला केला तरी गुण देण्याचे अधिकार हे सामान्य मतदारांना असल्यामुळे त्यांनी कौल दिला.

पराभव झाला तरी आपण सातत्याने पक्षाच्या प्रक्रियेत कार्यरत होते. आता विरोधी पक्षाच्या भूमिकेतून सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणार आहे. जिल्ह्यच्या मातीत आक्रमकता आहे. अन्याय सहन न करता संघर्ष करण्याची शक्ती प्रत्येकात आहे. नेत्यांचे विचार आणि भूमिका बदलल्या तरी सामान्य माणूस आपल्या नीतिमत्तेवर ठाम आहे. नवीन सरकारने कौतुक करावे असे अद्याप काम केले नाही. यापूर्वीच्या सरकारच्या योजना बंद करण्यातच सरकार व्यस्त आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

नामोल्लेख टाळून मंत्री मुंडेंवर टीका

पाटोदा तालुक्यातील भाजप सरपंचाला मारहाण, परळीतील व्यापाऱ्याला झालेली मारहाण या घटनांमधून काही लोक अशांतता पसरवत असल्याचा आरोप करत अप्रत्यक्षपणे नामोल्लेख टाळून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला. तर पाच वर्षं विकासासाठी भरपूर काम केले मात्र कधी वाजवून सांगितले नसल्याचेही त्या म्हणाल्या.