तरुणांनो तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा सुरु आहे, तुमच्या भविष्यावर वरवंटा फिरवला जातोय ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्या असं आवाहन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. जनआशीर्वाद घेण्यासाठी युवराज आले तर त्यांना तुमचा पैठणचा आमदार काम करतो आहे का हे विचारा. तसंच पाच वर्षांत तुम्ही काय केलंत कुठे होतात हेपण विचारा असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.

२२ मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली परंतु मुख्यमंत्र्यांनी सिंगल विंडो योजना राबवत क्लीनचीट देण्याचे काम केल्याचा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. पाच वर्षांत पैठण तालुक्यातील एमआयडीसी मध्ये उद्योग धंदे आले का? . किती मुलांना रोजगार मिळाला असा सवालही डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. १ लाख ४२ हजार कंपन्या बंद झाल्या आहेत. बेरोजगारांचे तांडे आज महाराष्ट्रात नाक्यानाक्यावर पाहायला मिळत आहे. हे सगळं घडत असताना सत्ताधारी भाजप सेनेचे यात्रा काढतातच कशा हे लोकांनी त्यांना विचारायला हवे असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

महाराष्ट्रावर आपत्ती आली त्यावेळी कोण काम करत होते हे मीडियाने दाखवले त्याबद्दल मिडियाचे आभार डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले. माजी आमदार संजय वाकचौरे यांनी यावेळी आपले विचार मांडले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आमदार संजय वाकचौरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, कबीर मौलाना आदींसह, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.