केळवे रोड परिसरात अनधिकृत चाळी, गाळे, इमारती; १०,००० कुटुंबांचे वास्तव्य

पालघर : पालघर तालुक्यातील केळवे रोड परिसरात शासकीय जमीन, आदिवासी नवीन शर्तीच्या जमिनींवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून अशा ठिकाणी उभारण्यात आलेल्या चाळींमध्ये सुमारे दहा हजार कुटुंबे वास्तव करत आहेत. या भागातील अनेक भूखंडांवर बेकायदा गाळे व इमारती उभ्या राहिल्या असून या विरुद्ध शासकीय विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

केळवे रोड परिसरातील देवीपाडा, दंडपाडा, मोहाळे तसेच मायखोप ग्रामपंचायतीच्या हद्दीत बंदाठे, झांझरोळी, धोंदळपाडा इत्यादी भागांमध्ये शासकीय जमिनी आणि आदिवासी नवीन शर्तीच्या जमिनींवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या ठिकाणी शेकडो चाळी उभ्या करण्यात आल्या आहेत. यापैकी अनेक ठिकाणी अजूनही मूळ जमीन मालकाच्या नावे घरपट्टी असून काही ठिकाणी घरे, गाळे खरेदी केलेल्या नागरिकांनी घरपट्टय़ा किंवा अन्य कागदपत्रे आपल्या नावे हस्तांतर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मूळ जमीन मालकाशी मुद्रांक कागदावर करारनामा करून उपलब्ध मोकळ्या जागेवर बेकायदा व अनियोजित पद्धतीने इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. या सर्व निवासी वसाहतींमधून निघणारे सांडपाणी रस्त्यावर येत असून काही रहिवासी वसाहतींचे सांडपाणी झांझरोळी बंधाऱ्यातून नदीमध्ये मिसळत आहे. यासंदर्भात अनेक स्थानिकांनी महसूल विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र २००४ पासून या अनधिकृत वसाहतींविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्याने अतिक्रमणे झपाटय़ाने वाढत आहेत.

काही ठिकाणी ग्रामपंचायतीमधून भूमाफियांनी बेकायदा दाखले मिळवले आहे. तसेच नदी व नाल्यांवर बांधकाम करून लगतची नदी प्रदूषित केली आहे. या गजबजलेल्या वस्तीमध्ये अमली पदार्थाची विक्री तसेच अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासकीय पातळीवर नोंदवल्या आहेत.

याप्रकरणी काही तक्रारी प्राप्त झाल्या असून चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शासकीय जमिनींवर किंवा शर्तीच्या जमिनींवर बांधकाम झाल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. – सुनील शिंदे, तहसीलदार, पालघर