मानाच्या सासनकाठय़ा डोंगरावर दाखल

श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चत्र यात्रेसाठी अवघी यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य विभाग, अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त आदी घटक तत्पर झाले आहेत. मानाच्या सासनकाठय़ाही डोंगरावर दाखल झाल्या असून आतापासूनच भाविकांची रीघ लागली आहे.

चत्र यात्रेसाठी पाडळी (निनाम), जि. सातारा, विहे (ता. पाटण), किवळ (ता., कराड) या मानाच्या सासनकाठीचे केखले (ता. पन्हाळा) गावातील माळावर मिरवणुकीने स्वागत झाले. या तिन्ही  सासनकाठय़ा सायंकाळी पाच वाजता यामाई मंदिराजवळ पोहोचल्या. मानाचा विडा देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी व कर्मचारी, पुजारी यांनी दिला.  त्यानंतर सासनकाठय़ा मिरवणुकीने मुख्य मंदिर परिसरात पोहोचल्या.

सकाळपासूनच भाविक यात्रेसाठी डोंगरावर दाखल झाले. पंढरपूर, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद या भागातील सासनकाठय़ा भाविकांनी एस.टी. वर व रेल्वेवर टाकून कोल्हापूपर्यंत आणल्या. तेथून  टाउन हॉलमाग्रे त्या पंचगंगा नदीकाठी पायी आणल्या होत्या. भाविकांनी नदीत स्नान केले. यंदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शिवाजी पुतळा परिसर व मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी मुख दर्शनाची सोय केली आहे. त्यामुळे भाविकांना गर्दीत न जात दख्खनच्या  राजाचे दर्शन होणार आहे. जोतिबा डोंगर रस्ता भाविकांनी भरून गेला आहे. खासगी वाहनांना डोंगरावर जाण्यास मनाई आहे. सनई, ढोल या पारंपरिक वाद्यांच्या निनादाने मंदिर परिसर दणाणून गेला आहे.

सामाजिक संघटना मदतीस तत्पर

दरवर्षीप्रमाणेच सहज सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांना मोफत अन्नछत्राची सोय केली आहे. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप केले जाणार आहे. तसेच शिवाजी चौक मंडळाच्या अन्नछत्राचेआज  उद्घाटन झाले. यात्राकाळात एक  लाख भाविकांना भोजनाचा लाभ येथून मिळणार  आहे. तसेच सौराष्ट्र  पटेल समाजातर्फे मोफत नाष्टय़ाची सुविधा केली आहे. येणाऱ्या भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी व्हाईट आर्मीतर्फे  डोंगरावर तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात यात्रा काळात भाविकांना आरोग्यविषयक तक्रार उद्भवल्यास त्यांच्यावर तत्काळ मोफत उपचार केले जाणार आहेत.