उपचारांचा खर्च देण्यासंदर्भातील आश्वासनाचा विसर; दोन आठवडय़ानंतरही रुग्णालयाला प्रतीक्षा

हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर : तारापूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटातील जखमींचा वैद्यकीय खर्च राज्य शासन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली होती. मात्र या घोषणेचा राज्य शासनाला विसर पडलेला आहे. जखमींवर औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र अजूनही या रुग्णालयाचे देयक राज्य शासनाकडून देण्यात आले नसल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ए. एन. के. फार्मा कारखान्यात ११ जानेवारी रोजी संध्याकाळी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर सात कामगार गंभीर जखमी झाले होते. जखमींवर औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सहा रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, तर एका रुग्णावर अजूनही उपचार सुरू आहेत. या उपचारांसाठी साडेतीन लाख रुपयांचा खर्च झाला असून त्याबाबतचा निधी राज्य शासनाकडून रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आलेला नाही, असे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले.

भीषण स्फोटात तारापूर हादरल्यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष तारापुरकडे लागले होते. राज्य शासनाने देखील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करत मदत त्यांच्याकडे पोचवली होती. मात्र जखमींचा खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा जरी मुख्यमंत्री यांनी केली असली तरी रुग्णालयाचे देयक अजूनही दिले नसल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे धक्कादायक म्हणजे पालघर तहसीलदार किंवा अन्य कोणताही अधिकारी मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर तेथे फिरकलासुद्धा नसून स्फोटात जखमींवर झालेला खर्च शासन देणार आहे याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले आहे.

तारापूर दुर्घटनेनंतर जखमींवर होणारा उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र या दुर्घटनेला १७ दिवस उलटून गेल्यानंतरही अजूनही उपचारांसाठी केलेला खर्च शासनाकडून देण्यात आलेला नाही, अशी माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली. मुलायम यादव या रुग्णाला अजूनही घरी सोडण्यात आले नाही. शासकीय निधी न आल्याने त्याला घरी सोडण्यात आले नसल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र त्याच्यावर अजून उपचार सुरू असल्याने त्याला घरी सोडले नसल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, राज्य शासन रुग्णांवर होणारा खर्च करणार आहे, या घोषणेबाबत काहीही कल्पना नसल्याचे पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांनी सांगितले.

रुग्णालयातील जखमींचा उपचारांसाठीचा खर्च शासन करणार आहे याबाबत मला माहिती नाही. याबाबत वरिष्ठ कार्यालयातून काहीही सांगण्यात आलेले नसून अधिक माहिती घेत आहे.

– सुनील शिंदे, तहसीलदार, पालघर

राज्य शासन आणि कारखाना व्यवस्थापनाकडून अजून एकाही रुग्णाचे वैद्यकीय देयक आलेले नाही. साडेतीन लाखांपर्यंत उपचारांसाठी खर्च झालेला आहे. इतर रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले असून एका रुग्णाच्या डोळ्याला दुखापत असल्याने त्यावर उपचार सुरू आहेत.

– संतोष शेट्टी, व्यवस्थापक, तुंगा रुग्णालय, तारापूर औद्योगिक वसाहत