‘किडनी घ्या पण, बियाणे द्या’ अशी करुण मागणी करणाऱ्या हिंगोलीच्या नामदेव पतंगे यांचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९अन्वये सभागृहात मांडला. मात्र धनंजय मुंडे यांची ही मागणी फेटाळण्यात आली. त्यावर या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाही, असं म्हणत मुंडे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला.

गेल्या तीन वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात सततचा दुष्काळ आहे. या तीन वर्षात शेतकरी पूर्ण होरपळून निघाला आहे. दुष्काळाला कंटाळून शेणगाव तालुक्यातील नामदेव पतंगे या अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक चणचण भासत असल्याने ‘किडनी घ्या पण, बियाणे द्या’ अशी करुण मागणी त्याने पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि सभागृहात यावर चर्चा व्हायला हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

मात्र मागणी फेटाळण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या अवस्थेची सरकारला काहीच पडलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना पूर्वमशागतीसाठी पेरणीसाठी 25 हजार रुपये हेक्टरी मदत अशी मागणी मुंडे यांनी सातत्याने लावून धरली आहे.