सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प
सरकारच्या कामगार विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला जिल्ह्य़ात मोटा प्रतिसाद लाभला. मुख्यत्वे वर्ग तीन आणि चारचे केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, खासगी व औद्योगिक क्षेत्रातील कामगार माठय़ा संख्येने संपात सहभागी झाले होते.
बुधवारी सकाळी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात मोठय़ा संख्येने कर्मचारी, कामगार सहभागी झाले होते. गांधी मैदानातून सुरू झालेल्या या मोर्चासमोर बोलताना खोंडे यांनी या लाक्षणिक संपानंतरही राज्य व केंद्र सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला.
कामगार-कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, राज्य कर्मचारी संघटना, हमाल पंचायत, विडी कामगार संघटना, विडी फेडरेशन, महापालिका कामगार संघटना, बँक युनियन, बीएसएनएल कर्मचारी संघटना, टपाल कर्मचारी संघटना आदी कर्मचारी या संपासह मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या संपामुळे संबंधीत कार्यालयांमधील कामकाज बुधवारी ठप्प झाले. राजपत्रित अधिकारी संघटनेने काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा दिला.
केंद्राप्रमाणे दि. १ जानेवारीपासून ६ टक्के महागाई भत्तावाढ मंजूर करुन रोखीने द्यावी, कंत्राटी व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरावीत, नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करुन निश्चित लाभाची पेन्शन योजना पुनस्र्थापित करावी, केंद्राप्रमाणेच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी राज्यांना लागू कराव्यात, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.