आदेश जारी, शाळा, महाविद्यालयांना वगळले

मुंबई : राज्य शासकीय कार्यालयांना २९ फेब्रुवारी २०२० पासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा शासन आदेश सोमवारी जारी करण्यात आला.

त्यानुसार शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना सर्व शनिवार व रविवार सुट्टी मिळणार आहे. शाळा, शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये, तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या आस्थापना, प्रकल्प, सफाई कामगार आदींना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही, असे या आदेशात स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी व अधिकारी संघटनांची मागणी होती.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दर दिवशी ४५ मिनिटांचा कामाचा कालावधी वाढवून पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद कायदा लागू आहे, अशा कार्यालयांना तसेच ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून गणल्या जातात अशी कार्यालये, शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतन, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांच्या आठवडय़ातून वगळण्यात आले आहे.