करोना संसर्गामुळे टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बालविवाह करण्याच्या घटना उजेडात येत आहेत. यवतमाळमधील जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे दारव्हा तालुक्यातील सावंगी येथे होऊ घातलेला बालविवाह नागरिकांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश मिळविले. टाळेबंदीच्या काळातला जिल्ह्यातील हा १२ वा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाने थांबविला आहे.
दारव्हा तालुक्यातील सावंगी गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील एका व्यक्तीसोबत आज (२३ जुलै) रोजी होणार होता. सावंगी शेजारच्या गावातील एका स्वयंघोषित समाजसेवकाने या विवाहासाठी पुढाकार घेतला होता हे विशेष. या विवाहाबाबत गोपनीय तक्रार महिला बाल विकास कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी सावंगी व सावळा या गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या मदतीने मुलीच्या पालकांची भेट घेऊन मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. हा विवाह केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यामुळे पालकांनी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावरच लग्न करण्याबाबत लेखी जवाब दिला व हे लग्न न करण्याचे निर्णय घेतला.
ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चना इंगोले, दारव्हा तहसिलदार जाधव तसेच लाडखेडचे ठाणेदार विनायक कारेगावकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत बालविवाहांची संख्या अचानक वाढली आहे. विशेष म्हणजे नेर, दारव्हा या तालुक्यांमध्ये ही संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त होत असून बालविवाह प्रतिबंधक जनजागृतीवर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 7:21 pm