राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार आहे असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसंच ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार करोनाच प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत आधी विचार होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ट आहे. तरीही ११ वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयं सुरु होण्यास थोडा वेळ लागतो आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाककरे बैठक घेणार असून ते विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउन सुरु केल्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शालेय शिक्षणाचे वर्ष १५ जूनला ऑनलाइन पद्धतीने सुरु झाले. मात्र शाळा सुरु झाल्या नाहीत. आता दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

कालच राज्य सरकारने शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची हजेरी ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयानंतर दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.