संदीप आचार्य, मुंबई

मानसिक आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संयुक्त योजनेतून आरोग्य विभागाच्या पुणे व नागपूर येथील मनोरुग्णालयांत पदव्युत्तर मानसोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

परिचारिका, चिकित्सालयीन मानसशास्त्र व मानसशास्त्रातील समाजसेवक हे प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू केले जाणार आहेत.

आरोग्य विभागाची राज्यात पुणे, नागपूर, ठाणे व रत्नागिरी अशी चार मनोरुग्णालये आहेत. यातील पुणे व नागपूर येथे अनुक्रमे २५४० व ९४० खाटा असल्यामुळे या ठिकाणी पदव्युत्तर मानसोपचाराचा अभ्यासक्रम चालवणे शक्य होणार आहे. मानसिक आजारांच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासकीय मनोरुग्णालयात पदव्युत्तर मानसोपचार अभ्यासक्रम चालविण्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ साली राज्याचे मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानुसार केंद्राकडे पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यासाठी आवश्यक ती परवानगी मागण्यात आली व केंद्राने तीन विषयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून हे अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.