News Flash

कापसातील ओलाव्यामुळे उत्पादकांसमोर अडचणी

विदर्भात चार लाख क्विंटलवर शासकीय कापूस खरेदी

(संग्रहित छायाचित्र)

विदर्भात चार लाख क्विंटलवर शासकीय कापूस खरेदी

अमरावती : विदर्भातील महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ तसेच सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा ओघ वाढला असला तरी कापसातील ओलावा ही शेतकऱ्यांसमोरील डोकेदुखी  कायम आहे.

शेतकऱ्यांनी यंदा खासगी बाजाराऐवजी शासकीय खरेदी केंद्रांवर गर्दी केली असून आतापर्यंत विदर्भात सुमारे ४ लाख ९८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात सीसीआयच्या खरेदीचा सर्वाधिक वाटा आहे. कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक हे हमीभाव देऊ शकत नाहीत. त्यामुळे खासगी बाजाराकडे शेतकरी फारसे फिरकलेले नाहीत. दुसरीकडे, पणन महासंघ तसेच सीसीआयकडून ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेल्या कापसाला ५ हजार ५५० रुपयांचा हमीभाव दिला जातो. त्यानंतर प्रत्येक टक्क्यासाठी १ किलोप्रमाणे पैसे कापले जातात. १२ टक्के आर्द्रतेपर्यंतचा कापूस शासकीय यंत्रणा खरेदी करते. यावेळी ८ ते १२ टक्के आर्द्रतेसाठी सरासरी चार किलोंचे पैसे कापले जातात. ५ हजार ३३५ रुपयांचा दर १२ टक्के आर्द्रतेत मिळतो. विदर्भात कापूस पणन महामंडळाच्या २४ तर सीसीआयच्या ४७ खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी केला जात आहे. खासगी बाजारात कापसाचे कमाल  दर ५३०० रुपयांवर आहेत.

मागील वर्षी कापसाचे दर खुल्या बाजारात साडे सहा हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. त्यामुळे चढय़ा दराच्या आशेने यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत कापसाच्या पेऱ्यात मोठी वाढ  झाली. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले होते. त्यातच भावही समाधानकारक होते. परंतु मागील वर्षी कपाशीचे क्षेत्र तुलनेने कमी असल्यामुळे मोजक्याच शेतकऱ्यांना चढय़ा दराचा फायदा होऊ  शकला होता. दरम्यान, यावर्षी शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्नाच्या आशेने कपाशीचे क्षेत्र वाढवले. परंतु बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीचा परिणाम कपाशीवर होऊन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच कापूस लागवडीचा खर्च तुलनेने प्रचंड वाढला. बहुतांश कापूस शेतकरी गावातच ५००० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करीत आहेत. खासगी बाजारात १२ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रतेचा कापूसही खरेदी केला जात आहे.

सर्वाधिक खरेदी यवतमाळात

मजुरांच्या टंचाईमुळे शासकीय खरेदी केंद्रापर्यंत कापूस नेणे शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे गावात मिळेल त्या भावात शेतकऱ्यांकडून खासगी दलालामार्फत कापसाची विक्री केली जात आहे. पण, दर कमी मिळत असल्याने अनेक शेतकरी शासकीय खरेदी केंद्रांवर वळले आहेत. विदर्भातील पणन महासंघाच्या २४ खरेदी केंद्रांवर ९२ हजार ९३७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयच्या ४७ खरेदी केंद्रांवर २ लाख ६७ हजार ५२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.  कापूस पणन महासंघाच्यावतीने नागपूर जिल्ह्यात ५, वणी तालुक्यात २, यवतमाळ ६, अकोला ३, अमरावती सहा तर खामगाव येथे २ केंद्रांवर शासकीय खरेदी केली जात आहे. यापैकी सर्वाधिक ६२ हजार २७१ क्विंटल कापसाची खरेदी यवतमाळच्या सहा खरेदी केंद्रांवर करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 4:16 am

Web Title: government purchase four lakh quintals cotton in vidarbha zws 70
Next Stories
1 पंकजा यांच्या शक्तिप्रदर्शनातून फडणवीस लक्ष्य!
2 रचना बदलल्यावर तरी ‘स्वाभिमानी’ जागृत होणार? राजू शेट्टी यांच्यापुढे आव्हान
3 रत्नागिरीमधून ‘वन डे सेलिब्रेशन’ची निवड
Just Now!
X