News Flash

बंदुकीच्या जोरावर नव्हे, तर संवादाने प्रश्न सुटतील- हजारे

जवान  शहीद  झाल्यानंतर त्याचे राजकारण केले जात असल्याबद्दलही हजारे यांनी नापसंती व्यक्त केली.

पारनेर : महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविषयी चिंता व्यक्त करीत, बंदुकीच्या जोरावर प्रश्न सुटणार नाहीत तर ते संवादाने सुटू शकतील, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. अशा घटना का व कशासाठी घडतात याची घटनेच्या मुळाशी जाऊन सरकारने चौकशी केली पाहिजे, असेही हजारे म्हणाले.

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षलवाद्यांच्या हल्लय़ात १५ जवान शहीद झाले, याविषयी राळेगणसिद्धीत बोलताना हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,की संवाद ही आपली परंपरा आहे. संवादाने मोठ मोठया तलवारी म्यान झाल्या आहेत हा आमच्या देशाचा इतिहास आहे. बंदूक किंवा हत्याराने प्रश्न सुटणार नाहीत तर ते अधिक जटिल होतील. समाजात अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी बॉम्बस्फोट घडविले जातात, कधी दंगली घडविल्या जातात. प्रश्न सोडविण्याचा हा मार्ग नाही. समस्या दूर करण्यासाठी संवाद झाला पाहिजे.त्यातून निश्चित प्रश्न सुटू शकतील. महाराष्ट्र दिनी झालेल्या स्फोटाची चौकशी झाली पाहिजे. यापुढील काळात अशा घटनांना प्रतिबंध केला गेला पाहिजे.

शत्रूपक्ष अथवा नक्षलवाद्यांकडून झाालेल्या हल्लय़ात जवान  शहीद  झाल्यानंतर त्याचे राजकारण केले जात असल्याबद्दलही हजारे यांनी नापसंती व्यक्त केली. सत्ता व पैसा काही लोकांच्या डोक्यात घुसल्यामुळे त्याचा दुरुपयोग कोठे होईल हे सांगता येत नाही, असा टोला लगावत राजकारण करण्याची जागा वेगळी आहे, समाज व देशाचे प्रश्न सोडविण्याचे मार्ग वेगळे आहेत. राजकीय व्यक्तींनी त्यात राजकारण आणणे योग्य नाही असे ते म्हणाले.

सरकार व नक्षलवाद्यांमध्ये मध्यस्थी करणार का, असा सवाल केला असता हजारे म्हणाले, का नाही ? समाज व देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे. असा संवाद करण्यासाठी दोन्ही बाजूचे लोक तयार असतील तर मी जरूर प्रयत्न करेन, असेही हजारे यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 1:49 am

Web Title: government should investigate conspiracy behind naxal attack anna hazare
Next Stories
1 गडचिरोली स्फोटातील शहिदांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत
2 अफवांनंतर दगडफेकीतील जखमीची पाच वर्षांची मृत्यूशी झुंज अखेर संपली!
3 वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात यंदा मराठा आरक्षण नाही
Just Now!
X