महाडमधील सावित्री नदीच्या पूरतांडवात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल ढासळल्याने दोन एसटी गाडय़ा आणि काही खाजगी वाहनांतील सुमारे ३५जण बुडून २४ तास उलटल्यानंतरही एकाही वाहनाचा वा प्रवाशाचा शोध घेण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकासह सर्वच यंत्रणांना कोणतेही यश आलेले नाही. संध्याकाळनंतर अंधार आणि पावसामुळे शोधकार्य थांबवावेही लागले. या दुर्घटनेच्या निमित्ताने या यंत्रणांची विश्वासार्हताच पाण्यात बुडाल्याचे विदारक चित्र मात्र समोर आले आहे.

या दुर्घटनेतील मदतकार्याबाबत यंत्रणेची संथ गतीही धक्कादायक आहे.  त्याचबरोबर यंत्रणेत समन्वय नसल्याने माहिती देतानाही गोंधळ झाल्याचे उघड झाले. या दुर्घटनेतील दोन मृतदेह हाती लागल्याचे जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी जाहीर केले. सायंकाळी मात्र एकही मृतदेह हाती लागला नसल्याचे जाहीर करण्याची नामुष्की यंत्रणेवर ओढवली. घटनेनंतर तब्बल सहा तासांनी म्हणजे सकाळी सहाच्या सुमारास जिल्हाधिकारी उगले आणि पोलीस अधीक्षक सुवेझ हक घटनास्थळी आले. त्यानंतर रुग्णवाहिका आणि क्रेन थडकल्या.  दुर्घटनेनंतर तब्बल नऊ तासांनी म्हणजे सकाळी पावणे नऊच्या सुमारास तटरक्षक दलाचे चेतक आणि नौदलाचे सिकिंग हेलिकॉप्टर थडकले आणि त्यांनी नदी परिसरात शोध सुरू केला. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक सकाळी सातला दाखल होणे अभिप्रेत असताना ते तब्बल १२ तासांनी दाखल झाले. कोलाड येथील रिव्हर राफ्टिंग पथक सकाळी आठच्या सुमारास दाखल झाले आणि चार मोठय़ा बोटी आणि दोन छोटय़ा बोटींनी शोध सुरू केला. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागोमाग अनेक नेत्यांनी या भागाच्या पाहणीसाठी दौरे सुरू केल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन शोधकार्यात अडथळे आले आणि पोलीस यंत्रणेवरही ताण पडला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०१६मध्येही ८८ वर्षांचा ह पूल वाहतूकयोग्य असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या दुर्घटनेला तेच जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

पुलांची तपासणी..

अशा दुर्घटना पुन्हा ओढवू नयेत यासाठी सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल आणि त्यांच्या भक्कमपणाचा आढावा घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनास्थळी सांगितले. शोधकार्यासाठी ३०० किलो वजनाचा चुंबक वापरला जात असून त्यायोगे बुडालेल्या वाहनांचा शोध सुरू राहील, असे ते म्हणाले.