पूरग्रस्तांना पुरेशी मदत मिळाली नाही असा आरोप करत, पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या पंचगंगा परिक्रमा यात्रेची आज नृसिंहवाडीत सांगता झाली. तर, त्यांच्या या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. कारण, पूरग्रस्तांचे प्रश्न आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या (सोमवार) राजू शेट्टी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे. असे मुख्यमंत्र्यांचे पत्र आज नृसिंहवाडी येथे राजू शेट्टी यांना प्रशासनाकडून सर्वांच्या समक्ष देण्यात आले. इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी राजू शेट्टी यांना मुख्यमंत्र्यांचे हे पत्र सादर केले. दरम्यान, या अगोदर नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिलेला होता. त्यानुसार आज काही कार्यकर्त्यांनी नदीपात्रात उड्या देखील मारल्या मात्र त्यांना पोलिसांनी तत्काळ बाहेर काढले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

तर, नृसिंहवाडी येथे सभा सुरू होण्यापूर्वी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे पत्र सादर केले. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांच्यासमवेत उद्या दुपारी तीन वाजता वर्षा शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले असल्याचे नमूद केलेले आहे.

राजू शेट्टींची पदयात्रा नृसिंहवाडीत पोहचली; कार्यकर्त्यांच्या नदीपात्रात उड्या!

या बैठकीत पूरग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. मात्र पूरग्रस्तांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी या विराट सभेत दिला.

शासनावर टीकास्त्र

सभेत राजू शेट्टी यांनी कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे, पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका उद्भवणार असल्याने राज्य शासनाने याबाबत वेळीच योग्य भूमिका घेण्याची मागणी केली. पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याचा शब्द अनेक गावांना शासनाने देवूनही अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. नवे पूल बांधताना धरण सदृश्य भिंती बांधल्याने पुराचा धोका वाढला आहे. याबाबत शासनाची भूमिका निष्क्रिय आहे. अशा अनेक मुद्द्यांवर शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या पुराकडे पुरेशा गांभीर्याने पाहण्याच्या निष्क्रिय धोरणावर टीकास्त्र सोडले.

माणसाने निसर्गाचे लचके तोडले त्यामुळे निसर्ग देखील बदलला –

तसेच, ”पंचगंगा नदी ही या कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. याच पंचगंगेवर म्हणजे भोगावतीवर शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं आणि म्हणून हा सगळा कोल्हापूर जिल्हा सुजलाम, सुफलाम झाला. पण याच पंचगंगेमुळे आणि कृष्णा नदीमुळे व एकूणच वारणा, दूधगंगा इत्यादी सगळ्याच नद्यांच्या पुरामुळे आज आमचं आयुष्य उध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे. म्हणून, प्रयाग-चिखलीमध्ये १ सप्टेंबर रोजी, दत्त महाराजांना अभिषेक करून त्यांचा आशीर्वाद घेतला. कारण, श्रावण महिना सुरू आहे. केवळ पंचगंगेच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची ताकद मला दे असं साकडं घातलं आणि पंचगंगेची परिक्रमा करत, नृसिंहवाडीत आज येऊन पोहचलो. हा जो पूर आलेला आहे आणि इथून पुढे वारंवार पूर येत जाणार आहे. कारण, माणसाने निसर्गाचे लचके तोडले त्यामुळे निसर्ग देखील बदललेला आहे. कधी नव्हे तर एवढा जास्त पाऊस पडायला लागलेला आहे. २२ व २३ जुलैला पडलेला पाऊस हा या शतकामधला सगळ्यात मोठा पाऊस होता, असं सरकार सांगतं. त्यामुळे पडलेला पाऊस वाहून नेण्याची नद्यांची क्षमता राहिलेली नाही. त्याला देखील काही कारणं आहेत. खाण माफियांनी डोंगर पोखरून ठेवलेले आहेत, स्फोट करून, सुरूंग पेरून डोंगर सगळे हलेले आहेत त्यामुळे जरा पाऊस पडला की दरडी कोसळायला लागल्या आहेत. ढासळलेल्या दरडी सगळ्य वाहत नदीमध्ये यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे नद्यांचं पात्र ओसाड झालेलं आहे. नद्या पाणी घेऊन वाहत असताना, त्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण झालेले आहेत. अनेक ठिकाणी पूल बांदलेले आहेत आणि पुलांच्या दोन्ही बाजूला भराव टाकलेले आहेत. त्या भरावामुळे पात्रावर पडलेलं पाणी पुढे सरकत नाही. पूर्वीही पूर यायचा पण दोन दिवसात जायचा आता, आठ-दहा दिवस पूर असतो, त्याला ही कारणं आहेत.” असंही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं.

भिंत बांधल्यानतंर शहरं वाचतील पण खेड्यात त्याचा परिणाम होईल. –

याचबरोबर,  ”कोल्हापूर जिल्ह्यात थोडी नाहीत तर ५६ पूलं आहेत. सांगली जिल्ह्यात ४८ पूलं आहेत आणि कर्नाटकात १६ आहेत. असे १२० पूलं या पुराला कारणीभूत ठरत आहेत. त्यातला कर्नाटकामधील सगळ्यात मोठा पूल म्हणजे मांजरीचा ज्याचा भराव कृष्णा नदीच्या दोन्ही बाजूला तीन किलोमीटर पर्यंत आहे, त्यामुळे कृष्णेचं पाणीच पुढे सरकत नाही. त्याचा फटका शिरोळ तालुक्याला बसतो. हे जे मानवनिर्मिती अडथळे तयार झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला त्रास होतोय. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करायला पाहिजे. कमी वेळेत जास्त पाऊस पडला तर सरकारने काय करयला पाहिजे? या संदर्भात काही मंत्र्यांनी मतं व्यक्त केलेली आहेत. त्यावर मी आता काही बोलत नाही. परंतु तो काय शास्त्रोक्त उपाय ठरेल असं मला काही वाटत नाही. कारण, भिंत बांधल्यानतंर शहरं वाचतील पण खेड्यात त्याचा परिणाम होईल. याची उदाहरणं मी परिक्रमेत पाहिलेली आहेत.” असंही राजू शेट्टी म्हणाले