स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला आंदोलकांची कोंडी करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू ठेवल्या. आंदोलकांची धरपकड सुरू ठेवली. कोल्हापुरात शंभरावर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नोटीस बजावून सोडून दिले. यावर खासदार राजू शेट्टी यांनी नापसंती दर्शवत शासन आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून शासनाच्या दडपशाहीला भीक न घालता आंदोलन सुरू ठेवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन आक्रमकपणे चालवण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. त्यामुळे प्रशासन दक्ष झाले आहे. पोलिसांनी रविवारी सकाळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यांना पोलीस ठाण्यात आणून ठेवले. अनुचित प्रकार करणार नाही, अशा आशयाची नोटीस बजावून सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले.

राज्यात अनेक ठिकाणी असा प्रकार घडल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. संघटनेचे नेते खासदार शेट्टी यांनी यावर नापसंती व्यक्त करत शासन आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला. शेतकरी या आंदोलनात उतरला असल्याने ते शक्तीनिशी केले जाईल,असेही ते म्हणाले.

तोडफोडीस सुरुवात
आंदोलन आक्रमकपणे होणार असे संघटनेने दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले आहेत. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे वारणा दूध संघाचा टँकर फोडण्यात आला. टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले, टँकरच्या काचा फोडल्या. तसेच अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेशमधून दूध घेऊन येणाऱा टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले. तसेच टँकरची तोडफोड करून तो पेटवून देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. येवलेवाडी (ता. वाळवा) फाट्यावर कार्यकर्त्यांनी मुंबईला निघालेल्या दुधाचा टँकर फोडला. टँकरच्या समोरच्या काचा फोडून टँकरमधील दूध रस्त्यावर सोडले.

गोकुळचा पाठिंबा
स्वाभिमानाचे आंदोलन यशस्वी होऊ नये असा प्रयत्न शासनाचा असताना राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाने आंदोलनाला पाठींबा दिला आहे. एक दिवसाचे बारा लाखाचे दूध संकलन थांबवणार असल्याचे सांगण्यात आले.