News Flash

राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा

महाविकास आघाडी सरकरचा मोठा निर्णय

राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सोमवारपासून एस. टी. सेवा सुरु करण्यात आली आहे. हा प्रवास मोफत असणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. करोना आणि लॉकडाउनमुळे विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेले लोक, विद्यार्थी, मजूर या सगळ्यांसाठी ही एसटी सेवा असणार आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रातल्या लोकांना हा प्रवास करता येणार नाही. रेड झोनमधल्या लोकांना प्रवास करायचा असेल तर त्यांची चाचणी होणार असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं. यासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सोमवारपासून एसटीद्वारे लोकांना आपल्या गावी जाता येणार आहे. यासाठी लोकांनी २२ जणांची एक यादी तयार करावी. शहरातल्या लोकांनी ही यादी पोलीस ठाण्यात तर गावातल्या लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे द्यावी. यामध्ये मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या ठिकाणी जायचं आहे? ही सगळी माहिती नोंदवायची आहे असंही परब यांनी सांगितलं.

मुंबई आणि पुण्यात करोना प्रतिबंधित क्षेत्रं आहेत. या ठिकाणच्या लोकांना प्रवास करता येणार नाही. रेड झोनमधल्या प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग केलं जाईल. त्यानंतर त्यांना प्रवास करण्याची संमती दिली जाईल. तसंच प्रवाशांना प्रवासादरम्यान मास्क लावणं अनिवार्य असणार आहे असंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाउन संपेपर्यंत प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे असा निर्णय घेतला गेल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. १८ तारखेपर्यंत विविध जिल्ह्यात अडकून पडलेले लोक हे त्यांच्या घरी पोहचतील यासाठी सोमवारपासून एस.टी. सुरु करण्यात येणार आहेत. प्रत्येक बसचं प्रवासाआधी आणि नंतर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे असंही परब यांनी स्पष्ट केलं. तसंच एका बसमध्ये साधारण २२ प्रवासी असतील जे विशिष्ट अंतर राखूनच प्रवास करतील असंही त्यांनी सांगितलं.

 प्रवासासाठी महत्त्वाच्या बाबी
१. सोशल डिस्टनसिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी यामुळे एका बसमध्ये साधारणपणे २१ ते २२ लोक बसू शकतात. त्यामुळे जर २१-२२ लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लीडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावीत. ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एस. टी. कधी व कोठून जाणार आहे याबद्दलची माहिती कळविण्यात येईल.

२. जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवार पासून सुरु होईल. ऑनलाइन अर्ज करतेवेळी आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.

३. या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बस मध्ये चढतेवेळी हात सनिट्झरने स्वच्छ करणारे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाईज केली जाईल.

४. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकारी त्या त्या नोडल अधिकारी यांच्याकडे असतील.

५. ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीयेत, त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे, तसेच फक्त सॅनिटाईज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरली जातील.

६. कंटेन्टेनमेन्ट झोन मधील नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही,ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 5:40 pm

Web Title: government will provide free bus service for maharashtra people who stuck in various districts due to corona and lockdown scj 81
Next Stories
1 “…म्हणून अंत्यविधीला २० जणांना तर दारुच्या दुकानासमोर हजारोंना परवानगी” : संजय राऊत
2 पंढरपुरहून विशेष रेल्वेने ९८१ प्रवासी तामिळनाडूकडे रवाना
3 राज्य शासनानं स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतवण्याची व्यवस्था करावी : चंद्रकांत पाटील
Just Now!
X