News Flash

माळशेज रेल्वेचा चेंडू राज्याच्या कोर्टात!

माळशेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने अनुकूलतेसह आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवल्यास हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी काहीच अडचण येणार नाही, असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी माळशेज

| January 15, 2015 04:00 am

माळशेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने अनुकूलतेसह आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवल्यास हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी काहीच अडचण येणार नाही, असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी माळशेज रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळास शुक्रवारी दिले.
माळशेज रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबईत प्रभू यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी प्रभू यांनी या प्रकल्पासाठी अनुकूलता दर्शवली. या चर्चेप्रसंगी मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक सुनील सूद यांनी नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी जमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकरी सहकार्य करीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या मार्गाचे बांधकाम रखडले आहे. मंजूर रेल्वेमार्गाच्या बांधकामास निधीचीही कमतरता असल्याचे ते म्हणाले. माळशेज रेल्वेमार्गासाठी कृती समितीचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन रेल्वेमंत्र्यांनी मागणी केल्याप्रमाणे या प्रकल्पास अनुकूलतेसाठी भाग पाडण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे यांनी सांगितले.
गेल्या अठरा वर्षांपासून कृती समितीच्या माध्यमातून माळशेज रेल्वेमार्गासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे परिषदा, अनेक मेळावे, दिल्ली वाऱ्या तसेच पाच लाख सहय़ांची मोहीम राबविण्यात आली. परंतु या मार्गाच्या मंजुरीसाठी सर्वपक्षीय नेते तसेच खासदारांनी सातत्याने अनास्थाच दाखवली. राज्याच्या देशहिताच्या असलेल्या या प्रकल्पासाठी येणाऱ्या रेल्वे अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आली नाहीतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभारण्याचा मनोदय समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे व उपाध्यक्ष दादा भालेकर यांनी हजारे यांची भेट घेऊन नुकताच व्यक्त केला आहे. या शिष्टमंडळात उद्योजक शिवाजी बेलकर, बाळासाहेब खिलारी, सतीश फापाळे, पोपट पायमोडे आदींचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 4:00 am

Web Title: governments readiness for malshej rail route
टॅग : Government,Parner
Next Stories
1 अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन शनिवारपासून सुरू
2 राजमाता जिजाऊंचा राजवाडा अखेरची घटका मोजतोय..
3 विदर्भातील १२ हजार टंचाईग्रस्त गावे फायद्यात!
Just Now!
X