|| संजीव कुळकर्णी
कार्यक्रमाकडे पालकमंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांची पाठ

नांदेड : तीन वर्षांपासून वापरात असणाऱ्या वसतिगृह इमारतीच्या उद्घाटनाचा घाट स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ प्रशासनाने घातल्याची बाब चर्चेत येताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी त्याचे उद्घाटन टाळले. राज्यपालांच्या या दौऱ्यात विद्यापीठातील शैक्षणिक दर्जाऐवजी जलसंधारण, पाणीपातळी अशा अशैक्षणिक बाबींवरच अधिक भर राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या वसतिगृहाची इमारत तीन वर्षांपासून वापरात असल्याची वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणली होती. त्यामुळे हा वसतिगृह उद्घाटन सोहळा बारगळला. दुसऱ्या एका वसतिगृहाचेही उद््घाटन होणार होते; पण तेही न करताच राज्यपाल विद्यापीठातून बाहेर पडले. राज्यपालांच्या कार्यक्रमाकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला राज्यपाल भगतसिंह   कोश्यारी यांनी गुरुवारी भेट दिली. राज्यपालांसमोर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची, शैक्षणिक बाबींची माहिती सादर केली. ‘नॅक’च्या मूल्यांकनात झालेल्या घसरणीच्या विषयाला कुलगुरूंनी स्पर्श केला नाही, असे सांगण्यात आले. अलीकडे ‘नॅक’ने केलेल्या मूल्यांकनामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पातळी घसरल्याचे निदान होऊन हे विद्यापीठ ‘अ’ मानांकनातून ‘ब’वर घसरले; पण विद्यापीठ परिसरातील जलसंधारणाच्या कामांमुळे आसपासच्या भागात जमिनीतील पाणीपातळीत चांगली वाढ  झाली, हीच बाब राज्यपालांच्या भेटीदरम्यान जोरकसपणे मांडण्यात आली.

नियोजित दौरा आणि विविध कार्यक्रमांसाठी राज्यपालांचे सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले तेव्हा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्यासह पोलीस, जि.प. आणि मनपा प्रशासनाचे प्रमुख तेथे हजर होते. काँग्रेस पक्षाच्या जि.प. अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर आणि महापौर मोहिनी येवनकर यांनी हजेरी लावत, स्वागताचा शिष्टाचार पूर्ण केला. भाजपचे आमदार राजेश पवार विमानतळावर हजर होते. सरकारमधील पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सर्व कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याचे दिसले. भाजपचे विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर यांनी राज्यपालांचे विद्यापीठात स्वागत केले आणि दुपारनंतर स्वतंत्रपणे भेट घेतली. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

एका दौऱ्यासाठी विमानाच्या दोन फेऱ्या

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नांदेडमध्ये येण्यासाठी राज्य सरकारने विमान उपलब्ध करून दिले. त्यानुसार गुरुवारी सकाळी ते या विमानाने नांदेडला उतरल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात विमान मुंबईकडे रवाना झाले. राज्यपाल शनिवारी दुपारी मुंबईला प्रयाण करणार असून त्यांना नेण्यासाठी विमान पुन्हा येथे येणार आहे. एक दौरा अन् विमानाच्या दोन फेऱ्या असा प्रकार बघायला मिळाला. नांदेड, हिंगोली आणि हिंगोली ते परभणी या प्रवासासाठी राज्यपालांना हेलिकॉप्टर उपलब्ध झाले नाही.

‘राज्यपालांच्या परखड भूमिकेमुळे दौऱ्याला विरोध’

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या परखड भूमिकेमुळे काही लोकांना त्रास होत असून, ते त्यांच्या दौऱ्याला विरोध करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असून, मुख्यमंत्री व मंत्री त्यांना सल्ला देतात. डॉ. पी. सी. अलेक्झांडर, जमीर हे राज्यपाल असताना त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्या वेळी त्यांच्या दौऱ्यांवर आक्षेप घेतले गेले नव्हते, असे फडणवीस म्हणाले.