राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज (शुक्रवार) पंढरपुर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी राज्यपाल मंदिरात प्रवेश करताना एका भाविकाने तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. मात्र, राज्यपालांनी राजकीय शिष्टाचार बाजूला सारत तेथे एका मातेच्या कडेवर असलेल्या बालकाच्या गळ्यात ती माळ घालून त्याचा सन्मान केला. वंश भालचंद्र पाटील असं त्या चिमुरड्याचं नाव आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी शहर आणि मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. राज्यपाल गाडीतून उतरताच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बडवे यांनी तुळशीहार स्वीकारण्याची त्यांना विनंती केली. काही सेकंदात राज्यपालांनी तो तुळशीहार हातात घेत बाजुला आईच्या कडेवर असलेल्या दोन वर्षीय वंश पाटील याच्या गळ्यात घालून त्याचा सन्मान केला.

यावेळी बंदोबस्ताला आलेले पोलीस आणि राज्यपालांनी राजकीय शिष्टाचार बाजुला सारून त्या चिमुरड्याचं कौतुक केलं आणि विठुरायाच्या दर्शनाला गेले. “आम्ही दर्शनाला आलो होतो. राज्यपालांना पाहून जाऊ म्हणून थांबलो. मात्र राज्यपालांनी वंशचा सरकार केला. माझ्या बाळाचा सत्कार देवाच्या दारी आणि राज्यपालांच्या हातून झाला हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे,” असे सांगताना वंशची आई भाग्यश्री पाटील यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. असे असले तरी राज्यपाल कोश्यारी यांच्या या समयसुचकतेचे आणि बालकाचे कौतुक होत आहे