कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना तुफान पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे जबरदस्त तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यंत्री उद्धव ठाकरेंपासून अनेक मंत्री आणि नेत्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला असताना आता खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील आज पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. या दौऱ्यानंतर राज्यपालांनी स्थानिकांना धीर देताना आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. २३ जुलै रोजी चिपळूणसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलं होतं. त्यामध्ये चिपळूणला पावसाचा सर्वाधिक फटका बसला होता. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.

“कुणीही राजकारण करत नाहीये”

नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिपळूणला भेट दिल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी देखील चिपळूणला भेट दिली. यावेळी स्थानिकांनी आपलं गाऱ्हाणं राज्यपालांसमोर मांडल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. झालेल्या नुकसानानंतर स्थानिक आक्रोश करत असल्याचं सांगताच राज्यपाल म्हणाले, “आक्रोश होणं स्वाभाविकच आहे. माझं घर बुडालं, तर आक्रोश होणारच ना. पण धीर तर ठेवावं लागेल ना. धीर ठेवा. सगळा देश तुमच्यासोबत आहेत. यात कुणीही राजकारण करत नाहीये.”

Chiplun Floods: नऊ लाख… नऊ तास अन् एसटीच्या टपावर बसून असलेले ते सात जण; आगार व्यवस्थापाने सांगितला थरार

राज्यपाल म्हणतात, “आमच्याही डोळ्यात अश्रू आले”

दरम्यान, यावेळी स्थानिक चिपळूणवासीयांशी बोलताना राज्यपालांनी त्यांना धीर दिला. “राज्यपाल म्हणून मी एवढंच सांगेन की खुद्द राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान देखरेख करत आहेत. तुमचे मुख्यमंत्री देखील भेटून गेले. इथले मंत्री आणि खासदार देखील आहेत. मी देखील यासाठीच आलो की प्रत्यक्ष पाहाता यावं. तुमचं जेवढं नुकसान झालं, ते पाहून तुमचेच नाही, आमच्याही डोळ्यात अश्रू आले आहेत. माणसं लावली जात आहे, बाहेरून येत आहेत. केंद्राकडून देखील मदत पाठवली जाईल. राज्य सरकार देखील मदत करेल. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत”, असं राज्यपाल म्हणाले.