विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे बलात्कार रोखता येतील, असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं असल्याचं वृत्त संर्व प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं. परंतु हे वृत्त चुकीच असल्याचा खुलासा राजभवनाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केला आहे.

नागपूर येथील संत तुकडोजी महाराज विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे बलात्कार रोखता येतील, असं ते म्हणाल्याचे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. त्याचं खंडन राज्यपाल भवनाकडून करण्यात आलं आहे.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले होते ?

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले होते की, “विद्या, धन आणि शारीरिक शक्ती अशा तीन शक्ती आपल्याकडे आहेत. नीतिकार म्हणतात जे दुष्ट आणि संत सज्जन व्यक्तींमध्ये काय अंतर आहे? जर दुष्ट आहे तर त्यांच्याकडे असलेली शक्ती वादासाठी असेल. त्यांच्याकडे धन असेल तर ते त्याच्यावरून अहंकार दाखवतील आणि ताकद असेल त्याचा वापर ते दुसऱ्यांना दु:ख देण्यासाठी करतील,” असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

“कोणी संत, सज्जन व्यक्ती असेल तर तो त्याच्या विद्येचा वापर इतरांना ज्ञान देण्यासाठी करेल. विद्या ही देण्यानं वाढते. जर त्यांच्याकडे धन असेल तर ते त्याचा वापर इतरांच्या भल्यासाठी, दान देण्यासाठी करेल आणि त्यांच्याकडे जर शक्ती असेल तर त्याचा वापर ते इतरांच्या संरक्षणासाठी करतील. आजकाल तुम्ही पाहात असाल माता भगिनींना त्रास देणारे, त्यांच्यावर अत्याचार करणारे किती लोक दिसतील. एक अशी वेळ होती जेव्हा लोक माता भगिनींची पूजा करत असतं, कन्यापूजन करत होते. परंतु आताची परिस्थिती पाहा काय आहे? असा सवालही राज्यपालांनी यावेळी केला. आपल्या ताकदीचा वापर संरक्षणासाठी करावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.