‘क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम’ (सीसीटीएनएस) प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील १०४१ पोलीस ठाणी आणि ६३८ वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालये जोडणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य झाले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले. ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘डिजिटल महाराष्ट्र’ घडविण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

डिजिटल महाराष्ट्राच्या दृष्टीने सीसीटीएनएस हे सकारात्मक पाऊल आहे. यामुळे पोलीस खात्यातील पारदर्शकता वाढेल आणि पोलिसांची कामगिरी व प्रतिमा उंचावेल. संघटीत गुन्हेगारीचे मोठे आव्हान आज पोलिसांसमोर आहे, असे या लोकार्पण सोहोळ्याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्याकरिता त्याचा पाया मजबूत असायला हवा. ती कमतरता दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या प्रकल्पाप्रमाणेच राज्यातील सर्व जिल्ह्यांत फॉरेन्सिकचे युनीट तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

या प्रकल्पासोबत पासपोर्ट, शस्त्र परवाना, विदेशी पर्यटक विभाग, वाहतूक विभाग, न्यायालय, कारागृहे जोडली जाणार असल्याने एका यंत्रणेत सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत १९९८ पासूनच्या सर्व गुन्हेगारांचा लेखाजोखा ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) ऑनलाईन द्यावा लागणार असल्याने त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही. प्रत्येक पोलीस ठाण्यात चार संगणक,  प्रिंटर, जनरेटर, इलेक्ट्रॉनिक पेन, डिजिटल कॅमेरा आदी साहित्य पुरविण्यात आले आहेत.

 

मुंबई पोलीस लवकरच ट्विटरवर येणार

 

नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी मुंबई पोलीस लवकरच ट्विटर  आणि फेसबुकवर येणार आहेत. पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी मंगळवारी ही माहिती दिली. कारभारात पारदर्शकात राहण्यासाठी नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले ते दर शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन पाहता येणार असल्यचोही ते म्हणाले.  सध्या सगळीकडे फेसबुक आणि ट्विटरचा वापर होत आहे. त्यामुळे मुंबई पोलीसही नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी लवकरच स्वत:चे ट्विटर आणि फेसबुक अकाउंट सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. पोलीस दलात पारदर्शीपणा ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी केलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारी पडताळून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.